पुणे : सेवा रस्त्यांचे काम आठवड्यात होणार पूर्ण

पुणे : सेवा रस्त्यांचे काम आठवड्यात होणार पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एनडीए चौकातील (चांदणी चौक) जुना पूल पाडल्यानंतर सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम 8 दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नवीन पुलांच्या कामासाठी दोन्ही बाजूला खांब उभारण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. वेद भवन समोरील अस्तित्वात असलेल्या सेवा रस्त्याच्या भरावाचे काम करण्यात आले आहे व उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम 20 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

श्रृंगेरी मठाच्या जागेचा ताबा 1 सप्टेंबर 2022 रोजी पुणे महानगरपालिकेकडून मिळाला आहे. सद्यस्थितीत महानगर पालिकेची जलवाहिनी टाकणे व उर्वरित सेवा रस्त्याचे काम सुरू असून पुढील 4 दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. बावधनकडून सातार्‍याकडे जाणार्‍या रॅम्प क्र. 6 चे काम पुढील 2 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. कोथरुड-वारजे सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून, उर्वरित काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल.

एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. 5 चे काम सुरू असून, पुढील 1 महिन्यांत पूर्ण होईल. मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे कामदेखील सुरू असून, ते पुढील 2 महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुळशी ते सातारा रॅम्प चे काम अंतिम टप्प्यात असून त्यावरून मुळशीकडून येणारी वाहतूक 13 सप्टेंबरपासून पासून वळविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news