पुणे : चतुःश्रृंगीवर तरुणांची हुल्लडबाजी उत्तररात्री अलोट गर्दी | पुढारी

पुणे : चतुःश्रृंगीवर तरुणांची हुल्लडबाजी उत्तररात्री अलोट गर्दी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वेळ रात्री दीड वाजताची… प्रवेशद्वारापासून ते मंदिराच्या पायथ्यापर्यंत चपलांचा खच, ओलांडून भाविक लहानग्यांना कडेवर, खांद्यावर, पाठीच्या झोळीत घेऊन देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. अशातच तरुण टोळके हुल्लडबाजी करून रांग मोडून घुसत होते. हा प्रकार पाहून मंदिर प्रशासन आणि थकले-भागलेले पोलिसदेखील हतबल झालेले पहायला मिळाले.
चतुःश्रृंगी हे पुण्यातील सर्वात मोठे देवीचे मंदिर असून, परिसरही प्रशस्त आहे. शहरासह संपूर्ण विभागातून भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. सध्या हे मंदिर उत्सवामुळे चोवीस तास खुले आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने मंदिर प्रशासनाला याचा अंदाज आलेला नाही. प्रवेशद्वारापासूनच भक्तांच्या गैरसोईला सुरुवात होते.

चपला ठेवण्यासाठीचे स्टॅण्ड प्रवेशद्वाराजवळ मंदिर व्यस्थापनाच्या वतीने करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तेथे चपलांचा ढीग साचतो आहे. दर्शनासाठी पायर्या चढून गेल्यानंतर एकाच ठिकाणी चपला ठेवण्याची व्यस्था करण्यात आली आहे. तेथे पाच रुपये शुल्क आकारले जाते. चढत-चढत भाविक वरती गेल्यानंतर त्यांची अधिक गैरसोय होत जाते. कारण महिला व पुरुषांची रांग वेगळी नाही. अनेक आडवळणे घेऊन बांबूच्या तकलादू बॅरिकेड्समधून वाट काढत भावीक दर्शनासाठी जातात, तेव्हा टोळक्याने आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी सुरू होते.

महिलांची सुरक्षा वार्‍यावर….
रविवारी रात्री दीडच्या सुमारास मंदिरात प्रचंड गर्दी होती. यात लहान बाळांना घेऊन आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. ही लहान बाळं गर्दीत कंटाळून आईच्या कुशीत झोपली होती. अशातच रेटारेटी सुरू झाली. पोलिसांनी काही महिलांना वाट मोकळी करून देत थेट दर्शनासाठी मंदिराकडे सोडले. मात्र, वरती पुन्हा एकादा त्यांची कोंडी झाली. एका लोखंडी जीन्यात पुन्हा रेटा-रेटीला सामोरे जावे लागले. हुल्लडबाज तरुणांच्या गोंगाटाने महिला कंटाळल्या होत्या. पोलिस बंदोबस्त असून देखील भाविकांच्या अलोट गर्दीसमोर ते देखील तोकडे पडत असल्याचे दिसले.

चेंगरा-चेंगरी होण्याचा धोका…
या ठिकाणी खालपासून वरपर्यंत बांबूचे बॅरिकेड्स लावले आहेत, ते तोकडे पडत आहेत. त्यामुळे नवरात्रीचे दोन दिवस या ठिकाणी गर्दी होऊन चेंगरा-चेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दर्शनासाठी महिला व पुरुषांची रांग वेगळी करण्याची गरज आहे. मंदिरात वरती शेवटच्या टोकाला लोखंडी जीना आहे, तेथे जास्त धोका असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आम्ही या घटनेची तत्काळ नोंद घेत आहोत. यात आम्हाला पोलिसांचे सहकार्य हवे आहे. आम्ही लोखंडी जीना असलेला परिसर व बांबूचे बॅरिकेड्स अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. महिला व पुरुषांची रांग वेगळी करून अधिक बंदोबस्त वाढवत आहोत. या ठिकाणी 21 कॅमेरे बसवले आहेत, त्याद्वारे आम्ही हुल्लडबाजी करणार्यांवर लक्ष ठेवू.भाविकांची गैरसोय होेणार नाही, याची अधिक दक्षता घेण्यात येईल.

                                                            – हेमंत अनगळ,
                                         व्यवस्थापकीय विश्वस्त, चतु:श्रृंगी देवस्थान

Back to top button