अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त; केशवनगरला महापालिकेची कारवाई | पुढारी

अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त; केशवनगरला महापालिकेची कारवाई

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: केशवनगर येथील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मांजरी रस्त्यावरील सात होर्डिंग्जवर सोमवारी कारवाई करण्यात आली. येत्या आठ दिवसांमध्ये येथील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप, उपायुक्त संदीप कदम, हडपसर मनपा सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अनिल डांगमाळी व राजू बडदे यांनी दोन डंपर, एक जेसीबी, गॅस कटर व कर्मचार्‍यांच्या मदतीने ही कारवाई केली.

होर्डिंग्जवर कारवाई करताना काही स्थानिक लोक आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे होर्डिंग्जवर कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक आहे. पण, तो पुरेसा मिळत नसल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले. केशवनगरमध्ये सुमारे 70 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाल्यापासून येथील होर्डिंग्जला कर आकारणी झाली नव्हती. त्यामुळे येथे अनधिकृत होर्डिंग्जचे प्रमाण वाढत गेले. सध्या येथे फक्त चार ते पाच होर्डिंग्ज अधिकृत आहेत. बाकी सर्व होर्डिंग्ज अनधिकृत असून महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. केशवनगरला महापालिकेची कारवाई

शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईची मोहीम सुरू केली असून, त्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. केशवनगर येथे कारवाई सुरू केली आहे. येथील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त करणार आहोत.
                                         माधव जगताप, आकाशचिन्ह विभागप्रमुख, महापालिका

 

Back to top button