केशवनगर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद | पुढारी

केशवनगर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केशवनगर भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत सुमारे आठ ते दहा नागरिकांना चावा घेतला असल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, कुत्र्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे अक्षरश: नागरी वस्तीत दुर्गंधी पसरली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीच्या वादामुळे या भटक्या कुत्र्यांवर कोणी कारवाई करायची, हा मुद्दा पुढे आला आहे.

केशवनगर भाग मागील चार वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाला आहे. या भागातील नागरिक मालमत्ता करासह सर्व प्रकारचे कर महापालिकेकडे जमा करीत आहेत. मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या कोणत्याही सुविधा या भागास मिळालेल्या नाहीत. केशवनगर भागातील मालमत्ता कर भरावयाचा झाल्यास ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तर इतर कामकाजाबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे नागरिकांना जावे लागते. या भागाची लोकसंख्या वाढली. मात्र, त्या प्रमाणात कोणताही विकास झाला नाही.

अशाच स्थितीत गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही कुत्र्यांनी मागील काही दिवसांपूर्वी सुमारे आठ ते दहा नागरिकांना चावा घेतला असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या भटक्या कुत्री करीत असलेल्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येत आहे. विशेषत: सर्व्हे नंबर 5 मध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याकडे क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त आणि कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.

याबाबत नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर सर्वसामान्य नागरिक आंदोलन करणार आहेत.याबाबत प्रतिक्रिया देताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड म्हणाले,“ मोकाट कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छदामुळे नागरिक त्रास्त आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त क्षेत्रीय कार्यालयाने केला पाहिजे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.”

Back to top button