पुणे : दूधखरेदीला तेजीची उकळी; खासगी डेअर्‍यांकडून दूध दरात वाढ | पुढारी

पुणे : दूधखरेदीला तेजीची उकळी; खासगी डेअर्‍यांकडून दूध दरात वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशात लम्पीचा प्रादुर्भाव काही राज्यांत अधिक झाला असून, तेथील दूधसंकलन घटले आहे. तुलनेने महाराष्ट्रातील दूधसंकलनात स्थिरता असून, अन्य राज्यांमधून महाराष्ट्रातील गायीच्या दुधाला मागणी वाढली आहे. त्यामुळे दूधखरेदीला पुन्हा एकदा तेजीची उकळी फुटली आहे. बहुतांश खासगी डेअर्‍यांकडून खरेदी दरात वाढ झाली आहे. या शिवाय नवरात्र, आगामी दसरा सणामुळे दुग्धजन्य पदार्थांना वाढलेली मागणी वाढल्यानेही तेजीस हातभार लागल्याचे सांगण्यात आले.

दुधाला मागणी वाढल्याने म्हशीच्या दूध खरेदीदरात 1 ऑक्टोबरपासून प्रतिलिटरला दोन रुपये, तर गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटरला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. 6.00 फॅट व 9.00 एसएनएफ गुणप्रतीच्या म्हशीच्या दुधाची खरेदी 47 रुपये 30 पैसे आणि 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या गायीच्या दुधाची खरेदी 36 रुपयांवर पोहचल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय वरकड खर्च वेगळा दिला जात आहे. तर दूध विक्रीदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व कल्याणकारी संघाचे मानद सचिव आणि ऊर्जा दुधाचे चेअरमन प्रकाश कुतवळ म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या लसीकरणामुळे लम्पी त्वचारोगाचा जनावरांमधील प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे दूधसंकलन टिकून राहण्यास मदत झाली आहे. याउलट चित्र देशातील अन्य राज्यांत असून, जनावरे मृत होणे व दूधसंकलनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अन्य राज्यांतून महाराष्ट्रातील दुधाला मागणी वाढल्याने तेजीस हातभार लागला आहे. दूधखरेदीतील स्पर्धेत शेतकर्‍यांना वाजवी भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे.

रिअल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे म्हणाले की, मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा कमी पडत आहे. सणासुदीमुळे दूध पावडर व बटरलाही चांगली मागणी आहे. प्रतिकिलोस दूध पावडर 300 ते 305 आणि बटरचा दर 410 ते 420 रुपयांवर पोहचला आहे. दहा ते पंधरा रुपयांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूधखरेदीत रस्सीखेच होत आहे. महाराष्ट्रातून दिल्लीला दररोज 6 ते 7 लाख लिटर आणि बिहारला दोन ते अडीच लाख लिटर दूध पाठविले जात आहे. दरातील सध्याची तेजी सणासुदीच्या काळात कायम राहण्याची अपेक्षा आहे.

पुणे विभागात दूधपुरवठा स्थिरच
पुणे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड म्हणाले की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत दुधाचे रोजचे संकलन 64 ते 65 लाख लिटर इतके होत आहे. हिरव्या चार्‍याची उपलब्धता वाढू लागल्याने सध्याच्या दूधसंकलनात वाढ अपेक्षित आहे.

खरेदीदराच्या वाढीत सहकार संघ पिछाडीवरच
खासगी डेअर्‍यांनी दूध खरेदीदरात वाढ तत्काळ लागू केल्याने सहकारी संघाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे संकलनात घट येण्याच्या शक्यतेने सहकारी संघांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशेषतः गायीच्या प्रतिलिटरचा सध्या असलेला 35 रुपये दूध खरेदीदर वाढवावा लागणार असल्याचे चित्र आहे.

किती वाढ
म्हैस : 2 रुपये
गाय : 1 रुपया

Back to top button