पिंपरी : उपवासामुळे वाढतेय पित्त, पोटदुखीचा त्रास | पुढारी

पिंपरी : उपवासामुळे वाढतेय पित्त, पोटदुखीचा त्रास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सव म्हटलं की, महिलावर्ग देवीची किंवा कुलदेवतेची उपासना म्हणून नऊ दिवस उपवास करतात. उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बहुतांशजण नऊ दिवस फक्त फलाहार करतात, तर काहीजण फराळाचे पदार्थ खातात. यामध्ये साबुदाणा, भगर आणि बटाटा, रताळे यापासून बनविलेले पदार्थ खातात; मात्र या उपवासाच्या पदार्थांमुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो, तर काहींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे.

साबुदाणा पचायला जड
उपवासाला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा व बटाट्यापासून तयार कलेले पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा व बटाटा हा प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून काही अपाय होत नाहीत; मात्र प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणा खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ असल्याने तो पचायला काही प्रमाणात जड असतो. तसेच, भगरीचे पीठ जास्त दिवसांचे असल्याने त्यापासून अपाय होण्याची शक्यता असते. साबुदाण्यातून शरीराला आवश्यक असणारे कोणतेही घटक मिळत नाहीत.

कडक उपवास टाळावा
आयुर्वेद शास्त्रानुसार वर्षाऋतू काळात व्यक्तींची भूक मंदावलेली असते. त्यामुळे या ऋतू काळात शरीराला आरामाची गरज असते. ही गोष्ट लक्षात घेत उपवासाचे नियोजन असते. उपवासाने शरीराला फायदे होतात, असे म्हटले जाते; पण त्याबरोबरच कडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थांचे जास्त सेवन झाल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मनोभावे उपवास करणार्‍यांनी हे उपवास करताना आपल्या आरोग्याला कोणता त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

तज्ज्ञांचा घ्यावा सल्ला
फक्त पाणी पिऊन किंवा फळे खाऊन उपवास असे प्रयोग अनेक जण करताना दिसतात. त्यामुळे वजन कमी होण्यासही त्याचा फायदा होतो, असे अनेकांचे मत असते; मात्र तज्ज्ञांचा सल्ला न घेता अशाप्रकारे केलेले उपवास आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

काय करावे उपवासात
उपवासाच्या दिवशी ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, शहाळे, नीरा अशी पेये आवर्जून घ्यावीत. त्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध हे उपवासाला चालणारे काही आरोग्यदायी पदार्थ आहेत, त्यांचा आहारात जरूर समावेश करावा.

उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
विशेषत: बाहेरचे अन्नपदार्थ खाताना विक्रेत्यांनी कोणत्या प्रकारचे तेल वापरले आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.

उपवासाच्या आधी आणि त्या दिवशी खूप थकवणारे व्यायाम, काम टाळा. त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.
तुम्हाला औषधे सुरू असल्यास उपवास करताना डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा, अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.
साबुदाण्यापासून कोणाला त्रास होत नाही; परंतु काही ठिकाणी भगर खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास झालेला आहे. त्यामुळे शहरात भगर व भगरीचे पीठ विकणार्‍यांकडून नमुने घेण्याची मोहीम सुरू आहे.
                                      – संजय नारागुडे, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन

Back to top button