नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी; कोथरूडमधील नागरिक त्रस्त; सीमाभिंतीची आवश्यकता | पुढारी

नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी; कोथरूडमधील नागरिक त्रस्त; सीमाभिंतीची आवश्यकता

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कैलास कॉलनी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. सीमाभिंतीची उंची कमी असल्याने नाल्यातील पाण्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसत आहे. तसेच साफसफाई वेळेवर होत नसल्याने दुर्गंधीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

कोथरूड डेपो येथील मेडी कॉर्नरपासून वाहत असलेला ओढा भुसारी कॉलनी, कैलास कॉलनी, सागर कॉलनी मार्गे पुढे वाहत जातो. नाल्यातील पाणी परिसरात शिरू नये म्हणून महापालिकेने सीमाभिंत बांधली आहे. ही भिंत काही ठिकाणी कमी उंचीची असून काही काही ठिकाणी पडली आहे. यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी परिसरात शिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. कैलास कॉलनी येथील नाल्यावर एका बाजूने भिंत नसल्याने येथे नागरिक कचरा टाकतात. यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा डुक्करे वाहनांना आडवी येत असल्याने अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

माजी नगरसेविका जयश्री मारणे म्हणाल्या, ‘माझ्या कार्यकाळात 2016 ला सीमाभिंतीबाबत निधीची तरतूद केली होती. कामालादेखील सुरुवात झाली होती. त्यातील काही काम पूर्ण झाले असून 2017 च्या निवडणुकीमुळे ते बंद झाले. त्यानंतर हे काम समाधानकारक झाले नाही. भिंतीची उंची कमी असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे प्रशासनाने आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे.’

कैलास कॉलनी परिसरात नाल्यावरील सीमाभिंतीच्या समस्येबाबत मुख्य खात्यांना कळविले आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून, लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल.

                                               – केदार वझे, अधिकारी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

Back to top button