पुणे : ‘अग्निशमन’मुळेच शहर सुरक्षित: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार | पुढारी

पुणे : ‘अग्निशमन’मुळेच शहर सुरक्षित: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आग आटोक्यात आणणे हेच अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांचे काम नसून, ते अनेक संकटांमध्ये समाजासाठी कार्यरत असतात. सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक कार्यरत असतात, त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत सुरक्षेचे महत्त्वाचे काम अग्निशमन दल करते. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे शहरातील अंतर्गत सुरक्षा आबाधित राहते,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशालेच्या सभागृहात जनतेला सेवा देणार्‍या अग्निशमन दल अधिकारी व जीवरक्षकांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिका उपायुक्त माधव जगताप, हेमंत रासने, पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी, विवेक खटावकर, पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित आदी उपस्थित होते. अग्निशमन दलप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांसह जीवरक्षकांचा सन्मान या वेळी करण्यात आला. तसेच श्री तुळशीबाग गणपती मंडळात वर्षभर सेवा देणार्‍यांना देखील गौरविण्यात आले. ‘श्रीं’ ची प्रतिमा, महावस्त्र व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.

पाटील म्हणाले, ‘सण, उत्सवांच्या काळात नागरिकांना शांतपणे झोप लागावी यासाठी पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर आणि अग्निशमन दलातील जीवरक्षक काम करत असतात. अग्निशमन दलातील जीवरक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे गरजेचे असून त्यांंना अद्ययावत साधनेदेखील पुरविणे आवश्यक आहे. अग्निशमन दलासह पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि समाजासाठी कार्य करणार्‍या व्यक्ती व कुटुंबांकरिता कायमस्वरुपी काम उभे रहायला हवे.’ प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांचा सामना करण्याचे प्राथमिक शिक्षण देणे, ही आजची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button