मंचर : कर्जाची परतफेड केल्यास संस्थेची प्रगती: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील | पुढारी

मंचर : कर्जाची परतफेड केल्यास संस्थेची प्रगती: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मंचर; पुढारी वृत्तसेवा: कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास संस्थेची प्रगती होईल, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवगिरी मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेचे दीपप्रज्वलन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , किरणताई वळसे पाटील, सीता बेंडे, पूर्वाताई वळसे पाटील, संस्थेचे संचालक यांच्या हस्ते पार पडले. अहवाल वाचन संस्थेच्या व्यवस्थापक गायत्री वाळेकर यांनी केले. संस्थेचे खेळते भांडवल 9 कोटी 62 लाख आहे. 7 कोटी 76 लाखांच्या ठेवी, कर्ज वाटप 5 कोटी 70 लाख असून नफा 9 लाख 42 हजार आहे.

संस्थेच्या संचालिका घोडेकर यांनी बचतगट व विविध योजनांची माहिती सभासदांना दिली. अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका राजमाला बुट्टे पाटील यांनी सभासदांसोबत संवाद साधला. संस्थेच्या अध्यक्षा किरणताई दिलीप वळसे पाटील यांनी, संस्थेची वाटचाल 10 कोटींच्या ठेवीकडे चालू आहे. संस्था सतत नफ्यात असून ऑडिट वर्ग ‘अ‘ आहे. तसेच संस्थेच्या खातेदारांकरिता 7 महिन्यांसाठी 7 टक्के व्याजदर संस्थेने दिला आहे, याचा लाभ खातेदारांनी घ्यावा.

या सभेस शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पराग साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके, सभापती देवदत्त निकम, अरुणा थोरात, रुपाली जगदाळे, उषा कानडे, अ‍ॅड. सुनिता पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button