बारामतीत शृंगी घुबडाला जीवदान | पुढारी

बारामतीत शृंगी घुबडाला जीवदान

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील पिंपळी येथे सचिन तांबे हे शेतकरी शेतामध्ये काम करत असताना एक मोठ्या आकाराचे घुबड शेतामध्ये जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी बारामती वनविभाग येथील वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांच्याशी संपर्क करून संपूर्ण माहिती दिली. गोलांडे यांनी वन्यजीव संवर्धनासाठी काम करणार्‍या बारामतीमधील रेस्क्यू या पर्यावरणप्रेमी संस्थेला या घटनेची माहिती दिली. संयुक्तपणे प्रयत्न करत या घुबडाला जीवदान देण्यात आले.

जखमी घुबड शेतामध्ये भेदरलेल्या अवस्थेत आढळून आले. जखमी असलेल्या शृंगी घुबडाची पाहणी करून त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी बारामती वन विभागाचे वन कर्मचारी तसेच रेस्क्यू बारामती संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या शृंगी घुबडाला बारामती वन विभाग येथे प्रथम उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी वन विभागाच्या वतीने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट बावधन पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शृंगी घुबड हा पक्षी निशाचर असल्याने फक्त रात्रीच आपल्या खाद्यासाठी बाहेर पडतो.

घुबड हा पक्षी प्रामुख्याने शेतातील उंदरे, छोटे किटक तसेच सरपटणारे छोटे प्राणी खाऊन आपले जीवन जगतो. त्यामुळे घुबड हा एक प्रकारे शेतकर्‍याचा मित्रच आहे. घुबडाबाबत अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आणि गैरसमज बाळगले जातात अशा अंधश्रद्धांना कधीही बळी पडू नये कोणत्याही प्रकारचा वन्य पशू- पक्षी जखमी अवस्थेमध्ये आढळून आल्यास आपल्या भागातील वनविभागाशी संपर्क साधावा आणि वन विभागाला सहकार्य करावे, अशी माहिती रेस्क्यू बारामती संस्थेचे श्रेयस कांबळे यांनी दिली.

Back to top button