शिरूर कृषी बाजार समिती नवीन इमारत कोणाच्या हट्टापोटी! | पुढारी

शिरूर कृषी बाजार समिती नवीन इमारत कोणाच्या हट्टापोटी!

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर शहरातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची जुनी इमारत अत्यंत सुस्थितीत असताना नवीन इमारत बांधण्याचा अट्टहास कोणामुळे, असा प्रश्न शेतकर्‍यांनी विचारला आहे. काही वर्षांपूर्वीच लाखो रुपयांचा खर्च नूतनीकरणासाठी करण्यात आला होता, तो आता पूर्ण वाया गेला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या पैशांचा अपव्यय झाला असल्याचा आरोप अनेक शेतकर्‍यांनी केला आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांसाठी निर्माण झालेली संस्था मात्र या ठिकाणी अनेक सुविधांपासून शेतकरी वंचित असताना संचालक आणि कर्मचार्‍यांसाठी कोट्यवधींचा खर्च करून कार्यालयाची उभारणी कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. बाजार समितीच्या आवारातील रस्ता हा निकृष्ट व कच्चा आहे. आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती अस्वच्छता असते, त्या ठिकाणी दुरुस्ती करून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी अनेक वर्षांपासून बाजार समितीकडे पडून आहे.

शेतकर्‍यांना पिण्यासाठी असलेल्या पाण्याची टाकी बंद आहे. जागोजागी अस्वच्छता आहे. शेतकरी बाजारासाठी कुठलेही नियोजन नाही संध्याकाळी या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते, याचा फटका शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना बसतो. बाजार आवारात अशा अनेक असुविधा असताना नवीन इमारतीचा अट्टाहास का?

शिरूर बाजार समितीचे जुने व नवीन गाळे हे सुद्धा ठरावीक लोकांच्या नावावर असल्याचा आरोप काही शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांसाठी असलेली संस्था मात्र या संस्थेत शेतकरीच उपेक्षित राहिला आहे. वर्षानुवर्ष असलेल्या या गाळ्यांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी काही शेतकर्‍यांनी केली आहे. शिरूर बाजार समिती अनेक समस्यांच्या गर्तेत अडकली असून अनेकांना त्रास होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील महत्त्वाची संस्था असून संस्थेत दैनंदिन बाजार तसेच दर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो. रस्त्यावर भरणारा बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. पोलिसांचा दंडदेखील विनाकारण भरावा लागतो. इतर दिवशी बाजार समितीत बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे तिथेही वहातूक कोंडीचा दुपारनंतर अनेकांना अनुभव येतो.

  • शेतकर्‍यांच्या पैशांचा अपव्यय
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
  • बाजार समिती अनेक समस्यांच्या गर्तेत

नवीन इमारतीचे काम देताना पारदर्शकतेचा अभाव
नवीन इमारतीचे काम देतानासुध्दा पारदर्शकता आहे की नाही हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेल्या संस्थेत निविदा देताना मर्जीतील लोकांना तर दिले गेले नाही ना ? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून या नवीन इमारतीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेची जाहीर सुनावणीची मागणी करण्यात आली आहे.

Back to top button