

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: आपल्या वासराला वाचविण्यासाठी एका गाईने थेट बिबट्यावरच चाल करून त्याला जोरदार धडक दिली आणि वासराची सुटका केली. आंबी (ता. हवेली) येथे ही घटना शुक्रवारी घडली आहे. शुक्रवारी (दि.30) आंबी गावच्या म्हस्कोबा दर्यातील रानात धोंडिबा बाबू ढेबे, बबन ढेबे, रामभाऊ वरपे, बापू ढेबे हे गुराखी आपली 30 -35 म्हशी, गाई, बैल, वासरे अशी जनावरे रानात चारत होते. दुपारी तीनच्या सुमारास सर्व गुराखी झाडाखाली बसले होते.
त्यावेळी गुराख्यांच्या समोरच जनावरांच्या कळपावर अचानक एका धष्टपुष्ट बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यातून गाई, बैल सैरावैरा पळाले. मात्र, एक वर्षाचे वासरू बिबट्याच्या तावडीत सापडले. बिबट्याने झेप घेताच वासराने जोराने हंबरडा फोडला. त्यावेळी गाईने थेट बिबट्यावरच चाल केली आणि बिबट्याला जोरदार धडक दिली. गाईच्या धडकेने बिबट्या कावराबावरा झाला. काही क्षणातच वासरू बिबट्याच्या तावडीतून सुटले.
गाईची वासरावरील माया पाहून गुराखी अचंबित झाले. हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे. जिवाच्या भीतीने गुराखी तेथून दूर जाऊन आरडाओरड करत होते. गाय मात्र आपल्या वासराचे प्राण वाचविण्यासाठी बिबट्याशी झुंज देत होती. वासरू तावडीतून सुटल्याने बिबट्या शेजारच्या जंगलातील गर्द झुडपात दबा धरून बसला होता. त्यामुळे गुराख्यांनी पुन्हा आरडाओरड केला. त्यानंतर बिबट्या तेथून पसार झाला.
वासराला जीवनदान मिळाल्याने गाईच्या मातृत्वाची माया पाहून बिबट्याच्या भीतीने दूर पळालेले गुराखीही भावनिक झाले होते.पशुपक्षातही मातृत्वाचे नातं आहे याची अनोखी प्रचिती आंबीकरांनी अनुभवली. आंबीचे ग्रामपंचायत सदस्य शंकरराव निवंगुणे म्हणाले, बिबट्याच्या हल्ल्यात दरवर्षी आठ- दहा जनावरांचे बळी जात आहेत. बिबट्यामुळे एकट्या गुराखी, शेतकर्यांच्या जीवाला धोका आहे. सरपंच मंगल निवंगुणे म्हणाल्या, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. दरम्यान वनविभागाने आंबी परिसरात गस्त सुरू केली असल्याचे सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले.