पुणे : उदमांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास | पुढारी

पुणे : उदमांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हिंजेवाडी फेज 2 परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्मीळ प्रजातीचे उदमांजर आढळले. त्याला वन कर्मचार्‍यांनी ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. वनरक्षक पांडुरंग कोपणार, वनपाल संजय अहिरराव, मल्लिनाथ हिरेमठ, कल्याणी मच्चा तसेच वनरक्षक व वन कर्मचारी उपस्थित होते. उदमांजर हा प्राणी भारतासह इतरही आशियाई देशांत आढळत आहे. स्थानिक भाषेत उद, उदबिल्ला, म्हसन्याउद नावानेही ओळखले जाते. हा एकट्याने राहणारा प्राणी आहे.

वजन 7-11 किलोपर्यंत असून लांबी 65 ते 75 सें.मी. भरते. या प्राण्याबद्दल अनेक प्रचलित अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले. उदमांजर या प्राण्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत या प्राण्याची छेडछाड करणे, जवळ बाळगणे, तस्करी करणे, शिकार करणे हा अपराध असून त्यास 3 ते 7 वर्षेपर्यंत कारावास तसेच 25 हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. वन्यजीवांशी संबंधित कोणतीही घटना आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे.

Back to top button