मांजरी येथील भुयारीमार्ग खुला; नागरिकांमध्ये समाधान | पुढारी

मांजरी येथील भुयारीमार्ग खुला; नागरिकांमध्ये समाधान

मांजरी; पुढारी वृत्तसेवा: मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग शनिवारपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसरातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष व नागरिकांनी हा भुयारी मार्ग खुला करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दुचाकी वाहनासाठी हा मार्ग गेल्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा भुयारी मार्ग दुचाकी वाहनांसाठी आता खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलेले आहे. त्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे.

प्रवीण रणदिवे म्हणाले, ‘या भुयारी मार्गात तातडीने दिवे लावावेत. यापूर्वी सोलापूर महामार्गावरून मांजरी फार्म या मार्गावरून भापकर मळा येथून चार किलोमीटरचा वळसा घालून मांजरीला जावे लागत होते. मात्र, हा भुयारी मार्ग सुरू झाल्याने विद्यार्थी व नागरिकांनी आता सोय झाली आहे.

मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामधून दुचाकी वाहने व नागरिकांना पायी जाता येईल. नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा.
                                                                        -मनोज झंवर,
                                                     जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

Back to top button