पेठ : लाभाच्या योजनांपासून मुलांना वंचित ठेवल्यास होणार कारवाई | पुढारी

पेठ : लाभाच्या योजनांपासून मुलांना वंचित ठेवल्यास होणार कारवाई

पेठ; पुढारी वृत्तसेवा: श्री वाकेश्वर विद्यालयात पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी अचानक भेट दिली. शाळेतील विद्यार्थी लाभाच्या योजनाचा लाभ विद्यार्थ्यांस दिला की नाही या विषयी माहिती घेतली. तालुक्यातील 53 माध्यमिक शाळांतील एसटी, एससी, एनटी, ओबीसी व इतर संवर्गातील विद्यार्थ्यांस विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यास अनेक शाळांमधून टाळाटाळ होते, ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये जाऊन आढावा घेण्यासाठी वाखारे आल्या होत्या.

याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी शिंदे, खेड तालुका गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, तालुका प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष सचिन तोडकर, पर्यवेक्षक शिवाजी आहेर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये स्कॉलरशिप, आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, सारथी शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्यांक, आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती परीक्षा इतर विद्यार्थी लाभार्थी योजनांबाबत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी आहेत.

त्यामुळे वाखारे यांनी पेठ व अमोंडी या दोन माध्यमिक विद्यालयात जाऊन माहिती घेतली. प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला पाहिजे. जे शिक्षक टाळाटाळ करतील त्यांचेवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाध्यक्ष अशोक वळसे पाटील यांच्या हस्ते वाखारे यांचा सत्कार झाला.

Back to top button