पिंपरी : ‘वायसीएम’मधील आयसीयू ‘फुल्ल’, नवीन रुग्णांना मिळेना जागा, एक ते तीन दिवसांचे ‘वेटिंग’ | पुढारी

पिंपरी : ‘वायसीएम’मधील आयसीयू ‘फुल्ल’, नवीन रुग्णांना मिळेना जागा, एक ते तीन दिवसांचे ‘वेटिंग’

दीपेश सुराणा : 

पिंपरी : शहरात सध्या कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. गेल्या तीन दिवसांपासून लागण होणार्‍या रुग्णांचे प्रमाण पन्नासच्या आत आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) एकवेळ अशी परिस्थिती होती की, कोरोनाच्या आजारामुळे रुग्णांना ‘आयसीयू’मध्ये बेड मिळत नव्हते. तर, सध्या अशी परिस्थिती आहे की, अन्य विविध आजारांवरील उपचार सुरू असल्याने वायसीएममधील आयसीयूचे बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे तातडीने उपचारांची आवश्यकता असलेल्या बाहेरील रुग्णांना वायसीएममधील आयसीयूमध्ये उपचार घ्यायचे असल्यास एक ते तीन दिवस वाट पहावी लागत आहे.

रुग्णसेवेचा अतिरिक्त भार कायम
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे आजही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांचे सर्वाधिक पसंतीचे रुग्णालय आहे. शासकीय दराने उपचार होत असले तरीही या रुग्णालयात उपचार करण्यासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रुग्णसेवेचा असणारा अतिरिक्त भार अद्याप कायम आहे. रुग्णालयामध्ये एकूण 4 अतिदक्षता विभाग आहेत. त्यामध्ये 48 बेड मोठ्या व्यक्तींसाठी तर, 25 बेड हे लहान मुलांसाठी आहेत. लहान मुलांसाठी असलेल्या बेडपैकी 15 बेड हे रुग्णालयात जन्मलेल्या मुलांसाठी आहेत. तर, 10 बेड हे अन्य रुग्णालयात जन्मलेल्या मात्र उपचारासाठी वायसीएममध्ये आणलेल्या रुग्णांसाठी आहेत.

विविध आजारांवरील रुग्णांनी बेड भरले
कोरोनाची साथ सध्या नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने बाधित होणार्‍या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. सध्या दररोज बाधित होणारे रुग्ण हे पन्नासच्या आत आले आहे; मात्र सध्या विविध आजारांवर उपचार घेणार्‍या रुग्णांमुळे वायसीएममधील आयसीयू भरले आहे. रस्ते अपघातातील जखमी, मेंदू, पोटाला मार लागल्याने जखमी रुग्ण, डेंग्यूचे रुग्ण, किडनी, यकृत आणि फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू असणारे रुग्ण आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

बेड उपलब्धतेची माहिती देणारी यंत्रणा बंद
शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये किती बेड भरले आहेत, किती रिक्त आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत, किती ऑक्सिजन बेड आहेत, याची माहिती देणारी यंत्रणा महापालिका वैद्यकीय विभागाने विकसित केली होती. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढलेला असताना त्यासाठी ‘वॉर रुम’ मार्फत यंत्रणा राबविली जात होती; मात्र आता वॉर रुमच बंद करण्यात आल्याने ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे आता पालिकेकडे याबाबतची संकलित माहिती मिळत नाही.

1 ते 3 दिवसांचे ‘वेटिंग’
अन्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना जर ‘वायसीएम’ मधील ‘आयसीयू’मध्ये दाखल करावयाचे असल्यास त्यासाठी 1 ते 3 दिवसांचा ‘वेटिंग पीरियड’ सध्या आहे; परंतु वायसीएम रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णालाच आयसीयूमध्ये हलवायचे असल्यास त्यासाठी एक ते दोन तास प्रतीक्षा करावी लागते. वायसीएमच्या आयसीयूमध्ये जागा उपलब्ध नसल्यास नवीन थेरगाव रुग्णालय, आकुर्डी आणि भोसरी येथील रुग्णालयात किंवा वेळप्रसंगी पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णांना
पाठविण्यात येत आहे.

 

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती देणारी यंत्रणा महापालिकेने उभारली होती. कोरोनाची रुग्णसंख्या वाढलेली असताना वॉररुममार्फत ही यंत्रणा राबविली जात होती; मात्र आता वॉर रुम बंद करण्यात आल्याने अशी संकलित माहिती उपलब्ध नाही.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

वायसीएमच्या 4 आयसीयूमध्ये सध्या 73 बेड आहेत. ते सर्व भरलेले आहेत. अन्य रुग्णालयांच्या आयसीयूत उपचार सुरू असलेले रुग्ण वायसीएममध्ये दाखल करावयाचे असल्यास त्यासाठी 1 ते 3 दिवस थांबावे लागते. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना मात्र 1 ते 2 तासांत बेड उपलब्ध करून दिले जातात. वायसीएमच्या आयसीयूमध्ये जागा नसल्यास महापालिकेच्या अन्य रुग्णालयात किंवा ससून रुग्णालयात जाण्यासाठी आम्ही रुग्णांना सुचवितो.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर

Back to top button