बारामतीकरांना शह देण्यासाठी दौंडला मंत्रिपद मिळणार का? | पुढारी

बारामतीकरांना शह देण्यासाठी दौंडला मंत्रिपद मिळणार का?

राजेंद्र खोमणे

नानगाव : राज्यातील व देशातील राजकारणात बारामतीकरांचा चांगलाच दबदबा असल्याने या वारूला आळा घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांगलीच व्यूहरचना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मंत्रिपदाचा दुसरा टप्पा शिल्लक आहे. जर बारामतीकरांना राजकारणात शह द्यायचा असेल, तर भाजपला राजकीय बुद्धिबळाच्या खेळात दौंडला मंत्रिपद देऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात ताकद उभी करावी लागेल. त्यामुळे बारामतीकरांना शह देण्यासाठी भाजपचे ग्रामीण भागातील एकमेव आमदार दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद देणार का? अशा चर्चेला तालुक्यात व जिल्ह्यात उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्षाने सध्या ‘मिशन बारामती’साठी चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच बारामती मतदारसंघाचा दौरा करीत वेगवेगळ्या घटकांना भेटी दिल्या असून, या दौर्‍यात त्यांना तालुक्यातून वेगवेगळ्या कामांबाबत निवेदने देखील देण्यात आली आहेत.

त्यामुळे केंद्रीय नेत्यांनी देखील बारामतीकडे आपली नजर वळवली असल्याची वस्तुस्थिती दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना मैदानात उतरविले होते. पवारांना राजकारणात शह देणारा नेता म्हणून आमदार कुल यांची जिल्ह्यात व राज्याच्या राजकारणात त्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती. राहुल कुल यांचे आई-वडील दोघेही आमदार होते, त्यामुळे कुल यांची जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी चांगली ओळख असून, सगळ्यांशी जवळीक आहे.

अनेकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याने त्यांना आरोग्यदूत म्हणून देखील ओळखले जाते. आमदार कुल हे मागील काळात देखील राज्यात रासपचे एकमेव आमदार होते. त्या वेळच्या निवडणुकीत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी, ‘मला तुम्ही आमदार म्हणून निवडून द्या, मी दौंडला मंत्रिपद देतो,’ अशी घोषणा केली होती. मात्र, त्या वेळी दौंडला मंत्रिपद मिळाले नाही. मागील निवडणूक कुल यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर लढवली व यामध्ये देखील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ते भाजपचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने मंत्रिपदाचा कार्यकत्र्यांचा आशेचा किरण मावळला.

अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाले आणि भाजप व शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना कुल यांच्या मंत्रिपदाचा आशेचा किरण दिसू लागला आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात, तर दुसरीकडे केंद्रातील नेत्यांनी सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यामुळे कुल यांना मंत्रिपद देऊन केंद्रातील मोठे नेते बारामतीकरांना धक्का देणार का? दौंडला कधीही मंत्रिद मिळाले नसून, ते कुल यांना मिळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजप ताकद वाढविणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

 

Back to top button