पुणे : 2286 मोटारींचा विमा दुचाकींच्या नावाने | पुढारी

पुणे : 2286 मोटारींचा विमा दुचाकींच्या नावाने

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहन विम्याच्या (इन्शुरन्स) कागदपत्रांतील बारकाव्यांचा गैरवापर करून एका दलालाने (एजंट) वाहनाचा प्रकार बदलून विमा उतरवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अनंत कचरे या दलालाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयसीआसी लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडित (वय 41, रा. बंडगार्डन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 कालावधीत घडली.

मोटारीचा इन्शुरन्स काढताना एजंटने ऑनलाइन पद्धतीने वाहनप्रकारात बदल केला. तीनचाकी, चारचाकी वाहने दुचाकी असल्याची भासवून फसवणूक केली. तब्बल दोन हजार 286 चारचाकी, तीनचाकी वाहने दुचाकी असल्याचे भासवून खासगी विमा कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स कंपनीने शासनाच्या वाहन संकेतस्थळावर माहितीची पडताळणी केली. त्या वेळी दलालाने अशाच पद्धतीने दोन हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी असल्याचे भासवून विमा काढल्याचे उघडकीस आले. त्यासाठी दलाल कचरे याने मोटारमालकांकडून जादा रक्कम घेऊन दुचाकींचा विमा उतरविल्याचे निष्पन्न झाले.

मोटारींसह इतर वाहनांचा कमी किमतीत विमा काढून देण्याच्या बतावणीने दलालाने वाहनमालकांना गंडा घातला आहे. आरोपींनी मोटारींच्या विम्यासाठी रक्कम घेऊन वाहनप्रकारात बदल केला. मोठी वाहने दुचाकी असल्याचे भासवून वाहनमालकासह विमा कंपनीची फसवणूक केली आहे.

                                – श्रीकांत सावंत, पोलिस उपनिरीक्षक, कोरेगाव पार्क, पोलिस

Back to top button