पिंपरखेडला हस्तच्या पावसाने झोडपले | पुढारी

पिंपरखेडला हस्तच्या पावसाने झोडपले

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसराला शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) संध्याकाळी हस्त नक्षत्राच्या पावसाने वादळी वार्‍यासह चांगलेच झोडपले. अगोदरच पडलेल्या पावसाने शेतकरी हतबल असताना आता पिके पुन्हा पाण्यात गेली. जोरदार झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पाण्याची चिंता मिटली असली, तरी खरिपातील अनेक पिकांचा बळी या पावसाने घेतल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बेट भागातील गावांमध्ये यावर्षी मान्सून जोरदार बरसला. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. ऊसाबरोबरच जनावरांची चारा पिके भुईसपाट झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. पिंपरखेड येथे जोरदार वार्‍यासह तासभर पडलेल्या पावसाने झाडे उन्मळून पडून विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे पिंपरखेडच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

तसेच पिंपरखेड येथून जांबूत येथील वीज उपकेंद्रांकडे जाणार्‍या मुख्य वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी रात्री 11 वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर शनिवारी दुपारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

पावसाचे पडणारे थेंब जमिनीत मुरायला जागाच शिल्लक राहिली नसून अनेक ठिकाणी जमिनींना पाझर फुटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जमिनी वाफशावर यायला वेळ लागणार असल्याने पुढील पिकांचे नियोजन या पावसाने कोलमडून गेले आहे. हस्त नक्षत्र व परतीच्या मान्सूनच्या पावसाने अशीच हजेरी लावली, तर शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन करणे अवघड होणार आहे.

सुलतानी आणि अस्मानी संकटाने शेतकरी रडकुंडीला
अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्यावर शासनाकडून या पिकांचे पंचनामे करण्यात आले. शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. त्यातच पुन्हा जोरदार पावसाने अस्मानी संकट शेतकर्‍यांवर कोसळल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

Back to top button