पिंपरी : ‘आरटीओ’मध्ये भरा क्यूआर कोडद्वारे चलन | पुढारी

पिंपरी : ‘आरटीओ’मध्ये भरा क्यूआर कोडद्वारे चलन

राहुल हातोले : 

पिंपरी : शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती मिळवणे व चलन भरणा करणे आता सहज सोपे झाले आहे. कार्यालयाने सुरू केलेल्या मदत कक्षातील क्यूआर कोड सुविधा सामान्यांना लाभदायक ठरत आहे. या सेवेचा लाभ 200हून अधिक नागरिक दिवसाला घेत आहेत.

मदत कक्षामुळे ज्येष्ठांना दिलासा
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी असते. तीन मजली असलेल्या या कार्यालयात आपल्याला हवे असलेले कार्यालय व अधिकारी शोधण्यासाठी ज्येष्ठांना देखील तीन मजले चढून जावे लागत होते. शिवाय गर्दीत थांबून त्यांना काम करावे लागत होते. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पुढाकाराने कार्यालयाच्या तळमजल्यावरच ‘मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. मदत कक्षातून हवी असलेली माहिती तर मिळतेच; शिवाय येथे लावलेल्या बुक लेटवरील ‘क्यूआर कोड’स्कॅन केल्याने हवी असलेल्या सेवेची माहिती आणि ई चलनसुद्धा लगेच भरता येते. त्यामुळे नागरिकांचा वेळेचा बचत होतो, तर कार्यालयीन कामाचा ताणदेखील काहीसा कमी होतो आहे.

दलालांना बसलाय लगाम
कार्यालयाच्या अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र, काही नागरिकांना आणि ज्येष्ठांना याविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते आरटीओ कार्यालयात गर्दी करतात. याचा गैरफायदा येथील दलाल मंडळी घेतात; मात्र कार्यालयाने सुरू केलेला मदतकक्ष आणि क्यूआर कोड सुविधेमुळे दलालांना लगाम बसला असून, नागरिकांना फायदेशीर ठरली आहे.

मदत कक्षाचा नागरिकांना फायदा
या मदत कक्षातून सहायक मोटार वाहन निरीक्षक येणार्‍या नागरिकांना काय मदत हवी आहे, याची माहिती घेऊन त्यांना तेथेच मार्गदर्शन करतात आणि त्यांना हवी ती सेवा उपलब्ध करून देतात.

‘क्यूआर’ द्वारे अशी होतात कामे
क्यूआर कोड स्कॅन करून थेट विभागाच्या वेबसाईटवर जाता येते. तसेच वाहनांच्या सेवेसंबंधीची कामे, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीची रक्कम, ई-चलन इत्यादी कामे क्यूआर कोडद्वारे करता येत आहेत. यामुळे नागरिकांना तत्काळ हवी असलेली माहिती मिळते.

कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या मदत कक्षामधून सामान्यांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. त्यांच्या समस्यांचे निवारण तत्काळ जागेवरच होत आहे. तसेच क्यूआर कोडमुळे सुविधेचा नागरिकांना अधिक लाभ होत आहे. त्यामुळे तक्रारीचे प्रमाण कमी झाले. कर्मचार्‍यांचे संख्याबळ कमी असले, तरी नागरिकांना सेवा मात्र उत्तम पद्धतीने दिली जात आहे.
                    – अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

Back to top button