पिंपरी : ओला कचरा समस्या अभियान तिसऱ्या टप्प्यात | पुढारी

पिंपरी : ओला कचरा समस्या अभियान तिसऱ्या टप्प्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 2016 अगोदरच्या, 2016 नंतरच्या ओला कचरा निर्माण करणार्‍या मोठ्या सोसायट्या आणि दैनंदिन 100 किलोपेक्षा कमी कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्या अशा तीन टप्प्यात महापालिकेकडून कचरा समस्येबाबत अभियान राबविले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर यांनी स्पष्ट केले आहे. चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनसोबत बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिल्याचे फेडरेशनकडून सांगण्यात आले.

शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ओल्या कचर्‍याच्यासंदर्भात सोसायटी फेडरेशनची बैठक अजय चारठाणकर यांच्या समवेत झाली. त्या वेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सचिव प्रकाश जुकंटवार, संघटक संजय गोरड, माजी महापौर नितीन काळजे, फेडरेशनचे पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी, सभासद आदी उपस्थित होते.

समन्वयाने तोडगा काढणार
सोसायटीधारकांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या जातील. कोणतीही जबरदस्ती किंवा हटवादी भूमिका न घेता सोसायटीधारक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयाने यावर तोडगा काढून याची अंलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. उपायुक्त चारठाणकर यांनी हे अभियान प्रामुख्याने तीन टप्प्यात राबवले जाईल असे सांगितले आहे. 2016 नंतरच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणा सोसायट्यांच्यासाठी पहिला टप्पा असेल. तर, 2016 पूर्वीच्या मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्यांसाठी दुसरा टप्पा असणार आहे. तर, दैनंदिन 100 किलोपेक्षा कमी कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्यांसाठी तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.

Back to top button