पिंपरी : शहरात लम्पीची साथ नियंत्रणात; आत्तापर्यंत 40 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण | पुढारी

पिंपरी : शहरात लम्पीची साथ नियंत्रणात; आत्तापर्यंत 40 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये सध्या जनावरांना होणार्या लम्पी आजाराची साथ नियंत्रणात आहे. आत्तापर्यंत 8 जनावरांना या रोगाची लागण झाल्याचे आढळले होते. त्यामध्ये नव्याने वाढ झालेली नाही. तसेच, महापालिका पशुवैद्यकीय विभागाने शहरातील 3 हजार 500 जनावरांपैकी 1 हजार 400 जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. म्हणजे लसीकरणाचे प्रमाण जवळपास 40 टक्के इतके आहे. त्याशिवाय, नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने जनावरांचे लसीकरण करुन घेत आहे.

दोन पथकांमार्फत लसीकरण
शहरामध्ये गोठे, पांजरपोळ आदी ठिकाणी महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने जनावरांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी डॉक्टरांचे दोन पथक तयार करण्यात आले आहे. महापालिकेकडे सध्या 2 हजार 500 लस उपलब्ध आहेत. बरेच नागरिक स्वतःहून त्यांच्याकडील जनावरांचे लसीकरण करुन घेत आहेत. भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट येथे असणार्या सुमारे दोन हजार गायींचे लसीकरण पांजरपोळ प्रशासनाकडून करुन घेण्यात आले आहे. 15 दिवसांपूर्वीच हे लसीकरण झाले आहे.

100 टक्के लसीकरणावर भर
लम्पी या आजाराची जनावरांना लागण होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता म्हणून महापालिकेकडून शहरातील सर्व 3 हजार 500 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवस लागतील. बर्याच ठिकाणी नागरिक स्वतःच जनावरांचे लसीकरण करुन घेत असल्याचे निदर्शनास येत आहे, अशी माहिती उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.

शहरातील अंतर्गत भागात जनावरांचे गोठे नाहीत. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 400 ते 500 मीटर अंतरावर हे गोठे आढळत आहेत. प्रत्येक गोठ्यावर जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. दोन गोठ्यांमध्ये जास्त अंतर असल्याने जनावरांमध्ये या रोगाची साथ पसरलेली नाही. त्यामुळे हा आजार सध्या नियंत्रणात आहे.
                  – सचिन ढोले, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, महापालिका.

Back to top button