पुणे : दहा वर्षे काम करून थांबायचंय! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच | पुढारी

पुणे : दहा वर्षे काम करून थांबायचंय! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जन्माला येणारा प्रत्येकजण कधी ना कधी निवृत्त होतोच. आगामी काळ मुलींचा आहे, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार आहे, असे सूतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे सभागृहातच त्यांच्या निवृत्तीवर चर्चा रंगली होती. पाटील यांनी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा डॉ. विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, संस्थेच्या मुलींच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबिर्डे आदी उपस्थित होते. समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थिनींचे आणि संस्थेचे अभिनंदन करून पाटील म्हणाले, ‘महिला मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मुलींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, हे कार्य कर्वे शिक्षण संस्था करीत आहे. संस्थेच्या तुकड्या वाढविणे, एखादी विद्याशाखा वाढविणे, यासाठी सहकार्य करण्यात येईल.’

लघुपटामुळे मोदींच्या डोळ्यांत पाणी
पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एक स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांवर लघुपट निर्माण करायचा होता. त्यामध्ये जवळपास 135 लघुपट आले होते. त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. यातील पहिल्या आलेल्या लघुपटाचे नाव ‘दोन कप चहा’ असे होते. हा लघुपट पंतप्रधान मोदी यांना दाखविण्यात आल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, असे पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयात देखील दोन मुलींनी लघुपटाची निर्मिती केली. लघुपट माणसाच्या आयुष्याला वळण देते. त्यामुळे आम्ही दिलेल्या विषयावर जर तुम्ही लघुपट तयार करणार असाल, तर आर्थिक साहाय्य देण्याचा शब्द देखील पाटील यांनी दिला.

Back to top button