

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी 23 लाख 50 हजार टनाइतका साखरेचा अपुरा कोटा खुला केला आहे. देशात दसरा आणि दिवाळी सणामुळे साखरेस राहणारी मोठी मागणी विचारात घेता देण्यात आलेला साखरेचा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे साखरेची दरवाढ अपेक्षित असून, ऐन दिवाळीत दर कडाडण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.
देशात साखरेचे मुबलक उत्पादन आणि शिल्लक साठा असताना ऐन दिवाळी सणासाठीची मागणी पाहता किमान दीड ते दोन लाख टनांनी साखरेचा कोटा कमी देण्यात आल्याचा सूर बाजारपेठेतून आळवला जात आहे. 24.50 ते 25 लाख टनांइतका साखरेचा कोटा खुला होण्याची अपेक्षा घाऊक बाजारपेठेस होती. मात्र, ती फोल ठरल्यामुळे साखरेचे दर तेजीकडे झुकल्याचे शुक्रवारी घाऊक बाजारपेठेतून सांगण्यात आले.
शनिवारपासून घोषित कोट्यातील साखरेच्या निविदांना सुरुवात होईल. त्यामुळे निविदांमध्ये दरवाढ होण्याची अपेक्षा आहे. घाऊक बाजारात सध्या एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3600 ते 3650 रुपये आहे. तर कारखान्यांवर साखरेच्या निविदा प्रति क्विंटलला 3335 ते 3375 रुपये या दराने विकल्या जात आहेत. कोरोना साथीनंतर बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय गणेशोत्सवही उत्साहात साजरा झालेला आहे. या पार्श्वभूमीवर दसरा-दिवाळी सणामुळे नेहमीच्या तुलनेत साखरेचा खप हा वाढता राहतो. त्यामुळेही अपुर्या कोट्यामुळे साखरेची दरवाढ होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून वर्तविण्यात आला.