जळोची : विनापरवाना बेकरी व्यवसायावर कारवाई गरजेची | पुढारी

जळोची : विनापरवाना बेकरी व्यवसायावर कारवाई गरजेची

जळोची; पुढारी वृत्तसेवा: बारामती व परिसरात अनेक ठिकाणी विनापरवाना बेकरी व्यवसाय सुरू असून, तेथे कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचा माल तयार केला जात आहे. यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांना बेकरी पदार्थ खावे लागतात. परंतु जर हे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असेल, तर ते नक्कीच आरोग्यास अपायकारक ठरते. सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात विनापरवाना बेकर्‍या राजरोसपणे सुरू आहे.

बहुतांश कंपन्या विनापरवाना सुरू असून, अनेक ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही. अनेक बेकर्‍यांमध्ये अद्यापही गंजलेल्या उपकरणांमधून पावाचे पीठ मळले जाते. निकृष्ट दर्जाचा व कालबाह्य झालेला मैदा, डालडा व इतर पदार्थ वापरले जातात. त्यामुळे बेकरी मालकांचे चांगलेच फोफावत आहे. नागरिकांना दर्जेदार बेकरी पदार्थाचा लाभ घेता यावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

नामवंत व ठराविक बेकरी व्यावसायिक यांनी शासनाची परवानगी घेतली आहे. ते सर्व नियम पाळतात. विनापरवाना बेकरी मालकांकडे नगर परिषद, ग्रामपंचायतींचा परवाना नाही. एवढेच काय तर एफडीएचा परवाना काय असतो, याची त्यांना साधी कल्पनासुद्धा नाही. त्यामुळे अत्यंत घाणेरडया आणि मानवी आरोग्यास धोका होईल, अशा वातावरणात बेकरी पदार्थाचे उत्पादन होत आहे. शेजारील नागरिकांनाही धूर, आवाज व दुर्गंधीचा त्रास होत असतो.

परराज्यातील बेकरी व्यावसायिकांमुळे प्रामाणिक व गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट व्यवसाय करणार्‍या, तसेच शासनाचे सर्व नियम पाळणार्‍या बेकरी व्यावसायिक यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ छापे टाकून निकृष्ट माल जप्त करावा व नागरिकांच्या आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.
महेश दुधाळ, उपाध्यक्ष, बेकरी असोसिएशन पुणे जिल्हा
चार पैसे जास्त गेले तरी चालतील,
पण गुणवत्ता व दर्जा असलेले व आरोग्यास अपाय होणार नाही असेच बेकरी पदार्थ ओळखीच्या बेकरीमधून खरेदी करणे चांगले.
आशा निंबाळकर, ग्राहक, बारामती

 

Back to top button