पुणे : चांदणी चौकातील पुलाचे काउंटडाउन सुरू

चांदणी चौकातील उड्डाणपूल शनिवारी मध्यरात्री स्फोटाद्वारे पाडण्यात येणार आहे.
चांदणी चौकातील उड्डाणपूल शनिवारी मध्यरात्री स्फोटाद्वारे पाडण्यात येणार आहे.
Published on
Updated on

पुणे; पुुढारी वृत्तसेवा: मुंबई- बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अंतिम टप्प्यात आणली आहे. पूल पाडण्याचे काउंटडाउन सुरू झाले असून, शनिवारी मध्यरात्री दोन वाजता स्फोट करून सहा सेकंदांत पूल पाडण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक शनिवारी रात्री अकरापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. हलक्या वाहनांसाठी तीन पर्यायी मार्ग उपलब्ध असून, जड वाहने महामार्गावरच लांब अंतरावर थांबविण्यात येतील.

मुंबई-बंगळुरू महामार्ग पुलाखाली चौपदरी आहे, तो सहापदरी करण्यात येईल. त्यासाठी संरक्षण भिंत व मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. बावधनकडून सातारकडे जाणारा रॅम्प क्रमांक सहा बांधण्यासाठी खडक ब्लास्टिंगद्वारे खोदण्यात येत आहे. एनडीएकडून थेट मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी रॅम्प क्रमांक पाचचे बांधकाम सुरू आहे. पूल पाडल्यानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूला दुपदरी सेवा रस्ता बांधण्यात येईल. त्यासाठी पुलालगतचा खडक फोडण्यात येत आहे.

अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस (मुंबई बाजू व सातारा बाजू) थांबवली जाणार आहेत. त्यासाठी टोलनाक्यावर व इतर ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. अन्य हलकी वाहने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरून वळविण्यात येतील. त्यासाठी दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना पूल पाडण्याच्या वेळेतील वाहतूक नियोजनाची माहिती कळविण्यात आली आहे.

पूल पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या एनसीसी कंपनीने घेतल्या आहेत. पुलावर स्फोटके भरण्यासाठी ड्रीलिंगच्या साह्याने 1300 छिद्रे पाडण्यात आली. मुंबई बाजू व सातारा बाजूकडील स्लॅबवरील जिओ टेस्क्टाईल लावण्यात आले. ए-1 व ए-2 अबटमेंटमध्ये स्फोटके भरण्यात आली. ए-2 अबटमेंट भागात सिमेंट राउटींगचे काम पूर्ण झाले आहे. कन्व्हेअर बेल्ट शिप्टींगचे काम पूर्ण झाले आहे.
महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, 'जोरदार पावसामुळे कामकाजात व्यत्यय येत असला, तरी पुलाला छिद्रे पाडून त्यात स्फोटके भरण्यात आली आहेत. त्यावर प्लास्टिकचे आवरण, जाळी आणि त्यावर कापड टाकण्यात आले आहे. याद्वारे स्फोटकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.'

पूल पाडण्यापूर्वी परिसरातील दोनशे मीटरपर्यंतचा भाग निर्मनुष्य करण्यात येईल. या भागात तीन खासगी हॉटेलचालकांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या या भागात आहेत. या टाक्यांच्या देखरेखीसाठी असलेल्या सुरक्षारक्षक आणि कर्मचार्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. मध्यरात्री अंधारात पूल पाडण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रकाशदिवे, कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

रात्री उशिरा झाली बैठक
चांदणी चौकातील पूल नियंत्रित स्फोटकांद्वारे पाडण्याची तयारी सुरू आहे. परंतु, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळी परिस्थितीत वाहतूक नियोजन, पूल पाडल्यानंतर परिसरात होणारा चिखल, अतिरिक्त वाहतूक यंत्रणा आदी परिस्थितीचेदेखील पूर्वनियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात पूल पाडणारी खासगी कंपनी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची रात्री उशिरा बैठक पार पडली.

बघ्यांना अटकाव करणार
पूल मध्यरात्री दोन वाजता पाडण्यात येणार असला तरीही, बघ्यांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून त्यांना अटकाव केला जाणार आहे. महामार्गावर वारजे आणि बावधन येथे, तर कोथरूड डेपो येथून पुढे नागरिकांना किंवा खासगी वाहनांना चांदणी चौकाकडे जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news