वेल्हे : जमिनीच्या ताब्यासाठी 30 लाखांची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

वेल्हे : जमिनीच्या ताब्यासाठी 30 लाखांची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे बुद्रुक (ता. हवेली) येथे 50 लाख रुपये देऊन खरेदी केलेल्या दहा गुंठे जमिनीचा ताबा देण्यासाठी 30 लाख रुपये खंडणीची मागणी करणार्‍या दोघांविरोधात हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  कैलास सोपान नानगुडे व सोमनाथ कंक, अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही गोर्‍हे बुद्रुक येथील आहेत. याप्रकरणी जमीनमालक अक्षता अनंत भरेकर (रा. हडपसर) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हवेली पोलिसांनी याबाबत सांगितले की, भरेकर यांनी ज्ञानेश्वर फाळके यांच्याकडून दहा गुंठे जमीन 50 लाख रुपये देऊन रीतसर खरेदी केली आहे. शुक्रवारी (दि. 29) खरेदी केलेल्या जमिनीत त्या गेल्या असता जमिनीचे जुने मालक फाळके यांच्या नावाचा फलक बेकायदेशीरपणे काढून फलकावर नानगुडे व कंक यांनी स्वतःचे नाव टाकून जेसीबी मशिनने खोदाई केली. जमिनीत अतिक्रमण केल्याचे दिसले.

या जमिनीचा ताबा घेण्यास दोघांनी भरेकर यांना विरोध केला. त्यासाठी दोघांनी 30 लाख रुपयांची खंडणी भरेकर यांच्याकडे मागितली. हवेलीचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे याप्रकरणी तपास करीत आहेत.

Back to top button