‘मेफेड्रॉन’ची विक्री करणारे त्रिकूट जेरबंद; शंकरशेठ रोड परिसरात गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

‘मेफेड्रॉन’ची विक्री करणारे त्रिकूट जेरबंद; शंकरशेठ रोड परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मेफेड्रॉन या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शंकरशेठ रोड परिसरातून पकडले. त्यांच्याकडून 4 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 लाख 86 हजार रुपयांचे 25 ग्रॅम 760 मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आहे. तालीब शकील अन्सारी (वय 23, रा. घोरपडेवस्ती, लोणी काळभोर), आयान अल्ताफ बागवान (वय 19, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), वसिम आसिम सय्यद (वय 19, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी तिघांची नावे आहेत. याबाबत खडक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थविरोधी पथक 1 ने शंकरशेठ रोडवर सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता मेफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, कर्मचारी विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, पाडुंरग पवार यांनी केली.

Back to top button