पुणे : आम्हाला एक सिलिंडर पुरतो दीड महिना; गृहिणींची भावना | पुढारी

पुणे : आम्हाला एक सिलिंडर पुरतो दीड महिना; गृहिणींची भावना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘घरगुती वापराच्या गॅसचे आता पंधरा सिलिंडर मिळणार असले, तरी ते आम्हाला पुरेसे आहेत. आमचे चार जणांचे कुटुंब आहे, तर साधारण दीड महिन्याला एक सिलिंडर पुरतो. जास्तीत जास्त वर्षाला बारा सिलिंडर पुरेसे आहेत,’ असे नाना पेठेतील सारिका अगस्ते सांगत होत्या. नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे.

कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. याबाबत इंडेन डिस्ट्रिब्युटर असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले, ‘सरासरी एका कुटुंबाकडून बारा ते तेरा सिलिंडर घेतले जातात. जास्त सिलिंडर लागणार्‍या कुटुंबांना अर्ज केल्यानंतर जास्तीचे सिलिंडर मिळू शकेल. मात्र, पंधराच्या सिलिंडर बंधनामुळे जादाचे सिलिंडर व्यावसायिकांना वापरासाठी देण्याचे प्रकार होतात.’

पुण्यात अनाधिकृत गॅस सिलिंडरमध्ये गॅस रीफिलिंग करण्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. नव्या नियमामुळे अशा प्रकारच्या घरगुती गॅसवापरामुळे अनधिकृतपणे रीफिलिंग करण्याला काही प्रमाणात ब—ेक लागेल, असे एका अधिकार्‍यांने सांगितले. नव्या नियमांचा फटका घरगुती खानावळ चालवणार्‍या महिलांना बसणार असल्याची भावना विमाननगर येथील अनिता सोनावणे यांनी व्यक्त केली.

Back to top button