पुणे : तर स्ट्रक्चरचे स्थलांतर करणार: अतिरिक्त आयुक्तांनी केले स्पष्ट | पुढारी

पुणे : तर स्ट्रक्चरचे स्थलांतर करणार: अतिरिक्त आयुक्तांनी केले स्पष्ट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या निधीतून किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘आय लव्ह…’चे स्ट्रक्चर, एलईडी आणि डिजिटल नामफलकांचा जर वाहतुकीस किंवा नागरिकांना अडथळा निर्माण होत असेल, तर त्यांचे स्थलांतर केले जाईल, असे स्पष्टीकरण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले.

शहरातील विविध पदपथांवर आणि चौकांमध्ये माजी नगरसेवकांसह राजकीय मंडळींनी उभारलेल्या ‘आय लव्ह…’ स्ट्रक्चर, एलईडी आणि डिजिटल नामफलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते. ही कारवाई आकाशचिन्ह, अतिक्रमण, पथ, विद्युत आणि बांधकाम विभागाने संयुक्तपणे करून अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले होते.

त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांनी गुरुवारी कारवाई सुरू केली होती. मात्र, दुपारी बाराच्या सुमारास आकाशचिन्हच्या मुख्य कार्यालयातून पालिकेच्या निधीतून आणि गावे महापालिकेत येण्यापूर्वी ग्रामपंचायतींच्या निधीतून उभारलेल्या स्ट्रक्चरवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देण्यात आले.

या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. खेमणार म्हणाले, ‘हे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी महापालिकेचा पैसा खर्च झाला आहे. मग त्यांची मोडतोड करणे योग्य ठरणार नाही. ज्या स्ट्रक्चरचा नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा होईल अशा स्ट्रक्चरचे जवळच्या बागेत किंवा अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल. मात्र, कोणतीही परवानगी न घेतलेल्या सर्वच स्ट्रक्चरवर कारवाई केली जाईल.

Back to top button