कालवा अस्तरीकरणाचे काम गोतोंडीला पाडले बंद, शेतकरी संघटना आक्रमक | पुढारी

कालवा अस्तरीकरणाचे काम गोतोंडीला पाडले बंद, शेतकरी संघटना आक्रमक

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : निरा डावा कालव्याचे सुरू झालेले गोतोंडी (ता. इंदापूर) येथील अस्तरीकरणाचे काम अखेर शेतकरी, ग्रामस्थ व शेतकरी संघटनेच्या पदा धिकाऱ्यांनी बंद पाडून केलेले काम जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले आहे. इंदापूर तालुक्यात निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या विरोधात अनेक आंदोलन झाली. रस्ता रोको झाले, अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या, परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नसून उलट जलसंपदा विभाग व ठेकेदाराने ते काम जोमाने सुरू ठेवले आहे. अखेर शुक्रवारी (दि. ३०) गोतोंडी येथे हे काम बंद पाडले आहे,हे काम जर असेच सुरू राहिले तर ७ ऑक्टोबरपासून अंथुर्णे येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा गोतोंडी येथील शेतकरी, ग्रामस्थ तसेच शेतकरी संघटनेने घेतला आहे.

यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते, कर्मयोगीचे माजी संचालक दिनकर नलवडे, सचिन कोथमीरे, दादासो किरकत, मंगेश घाडगे, आप्पा पाटील, गुरुनाथ पाटील, प्रशांत काळे, शिवराम बनकर आदींसह ग्रामस्थ तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दोन्ही माजी मंत्र्यांविरोधात शेतकरी आक्रमक

निरा डावा कालव्याचे जर अस्तरीकरण झाले तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकरी जागोजागी आंदोलन रस्ता रोको करत आहे. तरी देखील त्यावर तोडगा निघत नाही व काम सुरूच राहत आहे; यावर मात्र इतर वेळी शेतकऱ्यांचा मला किती कळवळा आहे हे दाखवणारे इंदापूर तालुक्याचे भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र याकडे कानाडोळा केला. या दोन्ही माजी मंत्र्यांच्या विरोधात शेतकरी वर्गात मोठी नाराज असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही शेतकरी काय आहोत, हे इंदापूरच्या दोन्ही माजी मंत्र्यांना दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.

Back to top button