...अखेर थोपटेवाडीच्या अजित सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील अजित विविध कार्यकारी सेवा सेवा सहकारी संस्थेवर सहायक निबंधकांनी अखेर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. कोर्हाळे बुद्रुक येथील जिल्हा बँकेचे विकास अधिकारी नितीन तावरे हे या संस्थेवर प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. या संस्थेतील कामकाजासंबंधी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी संचालकांनी सहायक निबंधकांकडे केल्या होत्या. संस्थेसंबंधी सहायक निबंधकांकडे गंभीर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
त्यात संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांची सहकार कलम 83 अन्वये चौकशी झाली होती. परंतु त्यांनी तो चौकशी अहवाल संचालक मंडळापुढे ठेवला नव्हता. संस्थेत नियमबाह्य पद्धतीने काम चालले असल्याचे सांगत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत संचालक प्रमोद बबनराव पानसरे, कमल जयवंत थोपटे, यशवंत कृष्णा कोंढाळकर, ज्ञानदेव महादेव कोंढाळकर, अशोक रामचंद्र थोपटे यांनी संस्थेच्या संचालक पदाचे राजीनामे दिले होते. सहायक निबंधकांनी यासंबंधीची माहिती संस्थेच्या सचिवांना दिली होती.
संस्थेच्या नऊपैकी पाच संचालकांनी राजीनामे दिल्याने कामकाजात पोकळी निर्माण झाली असून कामकाजासाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होणे शक्य राहिलेले नव्हते. राजीनामा दिलेल्या संचालकांनी संस्थेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार सहायक निबंधक (सहकारी संस्था) मिलिंद टांकसाळे यांनी या संस्थेवर जिल्हा बँकेचे विकास अधिकारी नितीन तावरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
आजची वार्षिक सभा रद्द
संस्थेच्या पाच संचालकांनी राजीनामे दिल्यानंतरही अध्यक्ष व सचिव यांच्याकडून शुक्रवारी (दि. 30) संस्थेची वार्षिक सभा बोलावण्यात आली होती. राजीनामा दिलेल्या संचालकांनी याला आक्षेप घेत सहायक निबंधकांकडे धाव घेतली होती. संस्थेवर आता प्रशासक नेमला गेल्याने अध्यक्ष, सचिवांना वार्षिक सभा घेण्याचा अधिकार उरला नाही. सभा घ्यायची झाल्यात ती प्रशासकांकडूनच घेतली जाणार आहे.