पुणे : नवोदित महिला उद्योजिकेची साडेतेरा कोटींची फसवणूक | पुढारी

पुणे : नवोदित महिला उद्योजिकेची साडेतेरा कोटींची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नवीन महिला उद्योजक होण्याची स्वप्ने असलेल्या महिलेला कंपनी उभी करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने नवीन मशिन म्हणून जुनी मशिन देऊन तब्बल 13 कोटी 52 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीसह सहा जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर येथील अल्ट्राटेक सिस्टिम कंपनीचे भागीदार अल्ताफ दिलावर शेख (41), भागीदार व इंजिनिअर रामदास कदम (42), रिझवान गरी शेख (55), प्रीतम गवळी (38), कमाल खान (48, सर्व रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रगती फक्कडराव शिंदे (23, रा. भाडळेवस्ती वाघोली, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रगती शिंदे या हटेक्स किंगडम अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालक आहेत. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी नवीन महिला उद्योजक असल्याचा व त्यांना त्याबाबत माहिती नसल्याचा गैरफायदा घेतला. फिर्यादी यांना कंपनी उभी करण्यासाठी मदत करतो असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या कंपनीचा विश्वास संपादन करत कंपनीसाठी नवीन मशिनी पुरवठा करतो, मार्केटिंगसाठी पण आमचीच माणसे आहेत असे बोलून फिर्यादीकडून वेळोवळी मशिन खरेदीसाठी रक्कम घेतली. त्या बदल्यात त्यांना आरोपींनी नवीन मशिन देण्याऐवजी बनावट मशिनचा पुरवठा करून तब्बल 13 कोटी 52 लाख 28 हजारांची फसवणूक केली.

Back to top button