तळेगाव दाभाडे : हायपावर टॉवरवर चढला माथेफिरू | पुढारी

तळेगाव दाभाडे : हायपावर टॉवरवर चढला माथेफिरू

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : येथील हायपावर टॉवरवर एक माथेफिरू चढून वायरला लटकला. परंतु, जास्त वेळ तग धरू न शकल्याने तो एवढ्या उंचीवरून खाली पडला. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमाटणे फाट्यावरील लडकत पंपाजवळील हायपावर विद्युत वाहिनीच्या टॉवरवर गुरुवारी एक माथेफिरू चढला होता. त्यानंतर तो हाय पावर टॉवरच्या टोकावर गेला व त्याने विद्युत वाहिनीची तार पकडली. परंतु, याची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस प्रशासनाने तत्परता दर्शवून विद्युतपुरवठा लगेच बंद केला होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीला शॉक बसला नाही.

चिखलात पडल्याने जीव वाचला
तारेला लटकत पुढे पुढे सरकत असताना हात निसटून एवढ्या उंचावरून तो खाली पडला. या वेळी पावसामुळे खाली चिखल असल्याने त्याला मुका मार लागला. पोलिस प्रशासनाने त्वरित रुग्णवाहिका बोलवून त्याला तळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. उन्मेश गुट्टे यांनी त्याच्यावर उपचार करून पुढील संदर्भ सेवेतील तपासणीसाठी पुढे रवाना केले. जर खाली चिखल नसता तर त्याला आणखी मार लागला असता. ही घटना पाहणार्‍या नागरिकांनी मात्र त्या व्यक्तीचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असे मत व्यक्त केले.

Back to top button