पिंपरी : भूमिगत केबलच्या कामात गैरव्यवहार ; माजी नगरसेवकाची तक्रार | पुढारी

पिंपरी : भूमिगत केबलच्या कामात गैरव्यवहार ; माजी नगरसेवकाची तक्रार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात फायबर केबल नेटवर्कच्या भूमिगत कामासाठी महापालिकेकडून मीटरमध्ये परवानगी घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात शेकडो किलोमीटर अंतराची भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. बोगस कागदपत्रे बनवून परवानगी पत्रावरील मीटरचे आकडे किलोमीटरमध्ये रूपांतरित करण्यात आले. टेलिकॉम कंपन्यांकडून महापालिकेची कोट्यवधीची फसवणूक झाली आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.  आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. कलाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मोबाईल नेटवर्किंगच्या विविध तीन कंपन्यांकडून शहरात भूमिगत केबल टाकण्यात आली.

त्यासाठी त्यांनी मीटरमध्ये परवानगी घेतली होती. एक किलोमीटर अंतराची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 300 ते 400 किलोमीटर अंतर केबल टाकली आहे, असा आरोप कलाटे यांनी केला आहे.  त्यासाठी पालिकेच्या परवानगी पत्रावरील मीटरचे आकडे किलोमीटरमध्ये बदलण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. असे प्रकार तीन विविध कंपन्यांनी केले आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ही तक्रार केली आहे. तसेच, काही नामांकित टेलिकॉम कंपन्यांनाही परवानगी घेतल्यापेक्षा अधिक अंतराची भूमिगत केबल टाकण्यात आली. त्यात स्मार्ट सिटीचे फायबर केबल नेटवर्किंगचे काम करणारी ठेकेदार कंपनीही सामील असल्याचेही कलाटे यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे पालिकेची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. या सर्व 9 टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.

Back to top button