राजगुरुनगरच्या वाडा रस्त्याने घेतला मोकळा श्वास | पुढारी

राजगुरुनगरच्या वाडा रस्त्याने घेतला मोकळा श्वास

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: शहरातून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील अतिक्रमणावर २९ सप्टेंबरला धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक वर्षानंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला. महसूल, नगरपरिषद, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवर राजगुरूनगर वासियांनी समाधान व्यक्त करत सोशल मीडियावर सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जोरदार स्वागत केले आहे.

शहरातून जाणाऱ्या आणि प्रमुख बाजारपेठ ठरत असलेल्या वाडा रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. जागोजागी केलेली शेड, हातगाड्या आणि बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावर नियमितपणे वाहतूक कोंडी होत होती. वाहनचालक, पादचारी हैराण झाले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी धोकादायक ठरत होती. अनेकदा वाहतूक ठप्प झाल्यावर पोलिसांना पाचारण करावे लागत होते. तर याच वाहतुकीच्या गर्दीमध्ये आठ दिवसापूर्वी एका सहा महिन्याच्या चिमुकलीचा बळी गेला होता. यावरून राजगुरुनगर शहरातील ‘आम्ही राजगुरुनगर’ या मथळ्याखाली अनेक युवक एकत्र आले.

त्यांनी चर्चासत्र आयोजित करून शांततेच्या मार्गाने गावात निषेध फेरी काढून प्रशासनाला निवेदन दिली. येत्या आठ दिवसात रस्त्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा व शहर बंदचा इशारा दिला होता. आक्रमक नागरिकांचा इशारा व आंदोलनानंतर सर्व प्रशासकीय अधिकारी खडबडून जागे झाले. गेले दोन दिवस या रस्त्याचे परीक्षण करीत गुरूवारी रात्री नऊ वाजता रस्त्याच्या आजूबाजूला असलेली सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटवली. त्यामध्ये राजगुरुनगर नगरपरिषद, खेड महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस पथक सहभागी झाले होते अशी माहिती पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी दिली.

महात्मा गांधी विद्यालयाबाहेर जवळपास ५० हातगाड्या
वाडा रस्त्यावर पंचायत समिती चौकात नेहमीच वाहतूक ठप्प होत होती. येथे असलेली शासकिय कार्यालये, विद्यालय, शाळा, दुकानदार, रस्त्यालगतच्या टपऱ्या आणि हातगाड्यावर येणाऱ्या सर्वांची वाहने वाहतूक ठप्प होण्याचे प्रमुख कारण होते. महात्मा गांधी विद्यालयाबाहेर जवळपास ५० हातगाड्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या विरोधात अनेकदा आवाज उठवला. मात्र कारवाई होत नव्हती. आजच्या कारवाईला शहरवासीयांकडुन म्हणूनच महत्व दिले जात आहे.

व्यर्थ न हो बलिदान ?
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाची पार्श्वभूमी राजगुरूनगर शहराला आहे. आजच्या कारवाईला काहीसे असेच स्वरूप प्राप्त झाले आहे. अगोदरच्या अनेक वर्षे त्रास सहन करणारे नागरिक सहा वर्षांच्या चिमुरडीचे रक्त सांडल्यावर ‘आम्ही राजगुरूनगर’ होऊन सरसावले.

 

Back to top button