पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरातील सर्व मिळकतीचे जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 2 लाख 32 हजार मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, लिडार यंत्राद्वारे 97 टक्के सर्व्हे झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.29) झालेल्या शहर सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. ऑनलाइन झालेल्या या बैठकीत आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, महाव्यवस्थापक अशोक भालकर, युवक प्रतिनिधी अमित तलाठी, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे यांच्यासह अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. शेखर सिंह म्हणाले की, जीआयएस सर्वेक्षणाअंतर्गत डोअर टू डोअर सर्वेक्षण सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या संबंधित विभागांचा सहभाग करून घेण्यात येत असून, नागरिकांसाठी प्रकल्प खुली करण्यात येणार आहेत.
ई-क्लासचे काम 80 टक्के
म्युनिसीपल ई-क्लासचे 80 टक्के काम झाले आहे. कंट्रोल अॅण्ड कमांड सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. एबीडी प्रकल्पांतर्गंत रस्त्यांचे 85 टक्के काम मार्गी लागले आहे. स्मार्ट बस थांबे उभारले जात आहेत. ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. स्मार्ट ट्राफिकचे कॅमेरे बसविले असून व्हीएमडी, किऑक्स, स्मार्ट पर्यावरण मशीन, स्मार्ट वॉटर मीटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आदी स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत,अशी माहिती सल्लागारांनी दिली.