पारगाव : अज्ञाताने कांदा बराकीत युरिया टाकल्याने शेतकर्‍याचे ५०० गोणीचे सडून नुकसान | पुढारी

पारगाव : अज्ञाताने कांदा बराकीत युरिया टाकल्याने शेतकर्‍याचे ५०० गोणीचे सडून नुकसान

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: शिंगवे येथील शेतकऱ्याच्या कांदा बराकीत अज्ञाताने युरिया टाकून मोठे नुकसान केले आहे. ही घटना २९ सप्टेंबरला उघडकीस आली. या नुकसानीत शिवाजी मुकींदा टाके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शिंगवे गावठाणानजीक दिलीप गोरडे यांच्या शेतामध्ये बांधलेल्या बराकीत तीन शेतकर्‍यांनी जवळपास १ हजार ५०० कांदा गोणी साठवला आहे. त्यामध्ये शिवाजी मुकींदा टाके यांच्या ५०० कांदा गोणी होत्या. त्यामध्ये शिवाजी टाके यांच्याच साठवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने कांद्याचे सडून मोठे नुकसान झाले आहे. बराकीतील ५०० गोणी कांदा सडल्याने त्यामधून पाणी गळत आहे.

सुमारे १५ दिवसापूर्वी टाके यांनी बराकीतील कांद्याची पहाणी केली असता त्यावेळेस कांदा सुस्थितीत होता. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा बाजारपेठेत पाठवायचे ठरवले होते. परंतू बराकीतील कांदा सडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच कांदा पिशव्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली. दरम्यान पुन्हा पाहणी केली तर संपूर्ण ५०० गोणी कांदा सडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांदा बराकीत युरिया टाकल्याचे आढळून आले आहे.

टाके यांनी कांदा पिकासाठी मोठे भांडवल लावले होते. तीन हजार रुपये किलो दराने बी आणले होते. त्यानंतर सुरुवातीपासून कांदा बराकीत टाकण्यापर्यंत मजुरीचा एक लाख रुपये खर्च झाला आहे. बाजारभाव वाढीच्या आशेने कांदा बराकीतच साठवला होता. आता कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली होती. परंतु समाजकंटकाने बराकीत युरिया टाकून शिवाजी टाके या शेतकर्‍याचे नुकसान केले.
३० सप्टेंबर रोजी सकाळी पोलिस पाटील गणेश पंडीत यांनी बराकीत जाऊन पहाणी केली. तर बराकीतील १३ गाळे (५०० गोणी ) कांदा खराब झाला असल्याचे दिसून आले.

Back to top button