पुणे : अकरावी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस | पुढारी

पुणे : अकरावी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि. 30) शेवटची मुदत आहे. आतापर्यंत 77 हजार 30 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले असून प्रवेशासाठी अद्यापही 34 हजार 720 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. या अंतर्गत तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेर्‍यांचे आयोजन केले आहे. तरी देखील अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीचे आयोजन केले आहे.

काही विद्यार्थी निवड होऊनही संबंधित विद्यालयांत प्रवेशासाठी जात नाहीत, त्यामुळे या विद्यालयांतील जागा भरण्याऐवजी अडवल्या जात असल्याचे प्रवेशादरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास कोणत्याही एका कॉलेजमध्ये निवड होण्यासाठी एकच संधी मिळेल.

यामुळे कोणत्याही विद्यालयात एकदा निवड झाल्यानंतर जर त्या दिवशी त्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्याला दुसर्‍या दिवसासाठी त्या कॉलेजसाठी अर्ज करता येणार नाही. त्या कॉलेजसाठी संबंधित विद्यार्थ्याला प्रतिबंधित करण्यात येणार असून संबंधित विद्यार्थ्यांना इतर कॉलेजसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी निवड झाल्यानंतर प्रवेशासाठी त्याचदिवशी जावे; अन्यथा त्या विद्यालयात पुन्हा अर्ज करता येणार नसल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
महाविद्यालये : 318
प्रवेशक्षमता : 111750
नोंदणी : 107698
कोटा प्रवेश क्षमता : 15608
कोटांतर्गत प्रवेश : 9880
कॅप प्रवेश क्षमता : 96142
कॅपअंतर्गत अर्ज : 76049
एकूण प्रवेश : 77030
रिक्त जागा : 34720

Back to top button