मजुरी करणारी रणरागिणी झाली रिक्षाचालक; शोभा कांबळे यांचे सिंहगड रोड परिसरात कौतुक | पुढारी

मजुरी करणारी रणरागिणी झाली रिक्षाचालक; शोभा कांबळे यांचे सिंहगड रोड परिसरात कौतुक

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: चार मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ती कष्टाची कामे, मजुरी करणार्‍या सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील रणरागिणी शोभा सुनील कांबळे (वय 43) या रिक्षाचालक झाल्या आहेत. त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. शोभा यांचा पती व चार मुली असा परिवार आहे. गरिबीमुळे त्यांना इयत्ता दुसरीतच शिक्षण सोडावे लागले. बिदर (कर्नाटक) येथून 22 वर्षांपूर्वी त्या पती व एक वर्षाच्या मुलीसह सिंहगड रोड भागात पोटापाण्यासाठी आल्या. सिंहगड रोड भागात मिळेल तेथे मजुरी करीत त्या नवले ब्रिजजवळ फळविक्रीची हातगाडी चालवत आहेत.

मात्र, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी स्वतःची रिक्षा घेऊन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्धार केला. त्यासाठी शोभा यांनी भाड्याने रिक्षा घेऊन चालवण्याचे प्रशिक्षण स्वतः घेतले. कोणत्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये न जाता रिक्षाचे परमिटही काढले. तसेच परिवहन विभागाचा रिक्षाचालक परवानाही काढला आहे. मात्र, जुन्या रिक्षा घेण्याऐवजी नवीन रिक्षा घेण्यासाठी त्यांनी धावपळ केली. मात्र, कर्ज काढण्यासाठी कोणी जामीनदारच मिळाला नाही. त्यामुळे त्या निराश झाल्या.

शोभा यांची कष्ट करण्याची धडपड पाहून हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर त्यांच्या मदतीला धावून आल्या. शोभा कांबळे यांना स्वतःची नवीन रिक्षा घेण्यासाठी भूमकर या स्वतः जामीन झाल्या. अवघे सहा हजार रुपये रोख भरून एका फायनान्स कंपनीने 3 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज रिक्षासाठी दिले. नवीन रिक्षा घेऊन शोभा कांबळे यांनी नर्‍हे, सिंहगड रोड, धायरी भागात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. रिक्षाचालक कष्टकरी महिलेचा स्वावलंबनाचा निर्धार पाहून त्यांचे नातेवाईक, नागरिक भारावून गेले.

स्वतःची रिक्षा विकत घेण्यासाठी सहा महिन्यांपासून धडपड सुरू होती. भूमकरताई मदतीला धावून आल्या. त्यामुळे मी आज रिक्षाची मालक झाले असून, प्रवाशांना सेवा देण्याचे व्रत स्वीकारले आहे.
                                                                       – शोभा कांबळे, रिक्षाचालक

 

 

 

Back to top button