बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: काही चेंबरची झाकणे खचल्याने वाहनांना छोटे-मोठे अपघात होत आहेत. एक रिक्षा चेंबरमध्ये अडकल्याने या रस्त्यावरील रहदारीवर परिणाम झाला. ऐन सणासुदीच्या काळात परिसरात ड्रेनेज लाईनची समस्या उद्भवल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळवूनसुद्धा ही समस्या अद्याप कायमस्वरूपी सुटली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यातदेखील या भागात पावसाळी व सांडपाणी तुंबली होती. त्यानंतर या वाहिन्यांची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, ही समस्या आता पुन्हा उद्भवली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गणेश सोनवणे म्हणाले, 'परिसरात ड्रेनेजची समस्या वारंवार निर्माण होत आहे. पावसाळी लाईनला डॉल्फिन चौकाकडून येणारी एक लाईन जोडल्यामुळे ही समस्या उद्भावत आहे. मुख्य खात्याकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून ही समस्या त्वरित सोडण्याचा प्रयत्न केला जाईल.'
महापालिकेने अप्पर परिसरात ड्रेनेजची विविध विकासकामे केली आहेत. मात्र, ही कामे दर्जदार न झाल्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न उद्भवत आहे. यामुळे ही कामे करणारे ठेकेदार व संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी
– अॅड. रवी गायकवाड, नागरिकगेल्या आठवड्यात या ठिकाणी असलेल्या सर्व ड्रेनेज लाईनची साफसफाई केली आहे. परंतु पूर्वी झालेल्या कामातील काही त्रुटींमुळे पुन्हा ड्रेनेज लाईन तुंबण्याची समस्या उद्भवत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा एकदा सर्व वाहिन्यांची स्वच्छता करण्यात येईल.
– दीपक सोनवणे, शाखा अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका