पुणे; पुढारी वृत्तसेवा: झारखंड येथील कलिंगा विद्यापीठात एफवायबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दर्शना प्रकाश जमगाडे ऊर्फ आयेशा मिर्झा (वय 30,रा. उंड्री) या महिलेच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश रामभाऊ पोपळभट (वय 41,रा. म्हसोबा वस्ती, मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 30 सप्टेंबर 2019 ते मे 2020 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी व्यक्तीशी संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना कलिंगा विद्यापीठ झारखंड येथे एफवायबीएचा प्रवेश करून देते असे सांगितले. त्यासाठी महिलेनेे आपल्या खात्यावर फिर्यादीकडून 55 हजार रुपये फी म्हणून भरून घेतले. त्यानंतर फिर्यादीला विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे सांगितले.
फिर्यादीला विश्वास वाटावा म्हणून महिलेने त्यांच्या मेलआयडीवर प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या. फिर्यादींनी देखील त्या सोडवून महिलेला पाठवल्या. काही दिवसानंतर फिर्यादींनी महिलेकडे निकालाबाबत विचारणा केली, तेव्हा महिलेने त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. याबाबत फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेवले करीत आहेत.