पुणे : परतीच्या पावसाने धुतले! अर्ध्या तासात 26.5 मिमीची नोंद | पुढारी

पुणे : परतीच्या पावसाने धुतले! अर्ध्या तासात 26.5 मिमीची नोंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहर आणि परिसरात गुरुवारी (दि.29) संध्याकाळच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली. अर्ध्या तासात जोरदार बॅटिंग केल्यामुळे 26.5 मिमी पाऊस झाला. परतीच्या या पावसामुळे रस्त्यांवरून जोरदार पाणी वाहिले. अनेक भागांत रस्त्यांना पूर आल्याचे दृश्य दिसत होते. दरम्यान, शहर आणि परिसरात 3 ऑक्टोबरपर्यंत गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. उकाडा वाढून नागरिक काहीसे हैराण झाले होते. गुरुवारी सायंकाळी मात्र अचानक विजेच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. तर, दुचाकी बंद पडल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील पाणी हळूहळू कमी होत गेले.

श्रीराम चौकाजवळ रस्ते कायम तुंबलेलेच
शहरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. हडपसर-हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकाजवळील सोसायटीसमोरील रस्ते कामानिमित्त खोदले गेले. परंतु, हे रस्त्ते पुन्हा ‘जैसे थे’ करण्याची गरज असताना मात्र ओबढ-धोबड पध्दतीने रस्त्यांचे काम केल्याने सोसायट्यांच्या गेटवरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. पालिका प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हडपसर-हांडेवाडी रोड परिसरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. पुन्हा एकदा नागरिकांना पाणी तुंबल्याने जीव मुठीत घेऊन चालावे लागले. त्यातच श्रीराम चौकाजवळ महंमदवाडी रस्त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर चेंबर तुंबल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने एकच दुर्गंधी पसरली होती. चौकाजवळ असलेल्या रुणवाल सोसायटी, फिफ्त अ‍ॅव्हेन्यूव्ह सोसायटी, सिध्दिविनायक सोसायटीजवळ पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते.

त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. शेजारीच छोटी-छोटी दुकाने असल्याने गाड्या रस्त्यालगत व सोसायटीजवळच पार्क केल्या जात असल्याने वाहतूक कोंडीचाही सामना नागरिकांना वारंवार करावा लागतो. फिफ्त अ‍ॅव्हेन्यूव्ह सोसायटीसमोरील रस्ता चांगला असताना रस्ता खोदाईनंतर रस्त्यावरच चढ झाल्याने सोसायटीच्या गेटवरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. आठवडाभर येथील पाणी निचरा होत नाही.

उपाययोजना करण्याची मागणी
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहेच. परंतु, स्थानिक प्रतिनिधींकडूनदेखील डोळेझाक झाल्याचे दिसून येेते. त्यामुळे सोसायटीसमोर वारंवार साचत असलेल्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. श्रीराम चौकाकडून महंमदवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील बाईक जंक्शन या गॅरेजसमोर रस्त्यातच खड्डेच खड्डे झाल्याने व मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी आता केली जात आहे.

सेनापती बापट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
जोरदार पावसामुळे सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. यातून मार्ग काढताना पादचारी, दुचाकीस्वारांच्या नाकी नऊ आले. बालभारती जवळ, लॉ कॉलेज रस्त्यावर भांडारकर इन्स्टिट्यूट समोरसुध्दा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. येथे उथळ भाग असल्याने एकाच ठिकाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पाण्याबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. परिणामी, वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

 

Back to top button