

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : राजीव गांधी आयटी पार्क फेज-3 येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये दुर्मिळ असलेले उदमांजर आढळून आल्याची घटना रविवारी (दि. 25) रात्री 8 च्या सुमारास घडली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या उदमांजराला प्राणीमित्रांनी कोणतीही इजा होऊ न देता पकडून पौड वनअधिकार्यांच्या सूचनेनुसार जंगलात सोडून जीवदान दिले. येथील सर्पमित्र अजित भालेराव यांना फोन करून त्यांना यासंबंधी माहिती देण्यात आली. मांजरासारखा दिसणारा कुठला तरी प्राणी कँटीनमध्ये शिरला आहे. ही माहिती वाईल्ड अॅनिमल्स अॅण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी संस्थेतील प्राणिमित्रांना देण्यात आली.
त्यानुसार, सर्पमित्र तुषार पवार, शेखर जांभूळकर, अजित भालेराव, तुषार जोगदंड व श्रीनिवास देवकाते यांची सर्व टीम तिथे दाखल झाली. या प्राणीमित्रांनी पाहणी केली असता ते जंगली उदमांजर असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन 5 किलो व उंची गुडघ्याच्या मानवी खालोखाल होती. याबाबत मुळशीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर यांना ही माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार उदमांजराला पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. दुर्मिळ होत चाललेले उदमांजर हा सस्तन प्राणी आहे.