पेमदरा ग्रा.पं. कारभाराची चौकशी करा, ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा | पुढारी

पेमदरा ग्रा.पं. कारभाराची चौकशी करा, ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पेमदरा ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकाच्या अपहाराची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीकरिता दि. 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाते यांनी दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाते यांनी पुणे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आदींना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात दाते म्हटले आहे, की सरपंच व ग्रामसेवक यांनी सन 2018-2019 व 2020-2021 या काळात विविध योजनांतर्गत पेमदरा ग्रामपंचायत कारभारात मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत दप्तराची तपासणी करण्यात यावी. विशेष म्हणजे यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाते यांनी सांगितले आहे. या निवेदनात दोषी सरपंच व ग्रामसेवक, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच दि. 2 ऑक्टोबरपूर्वी ग्रामपंचायतीने चौकशी अहवाल सादर केला नाही, तर पेमदरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Back to top button