पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना बंद करा, अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने बंद करण्याची नामुष्की | पुढारी

पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना बंद करा, अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने बंद करण्याची नामुष्की

पिंपरी : महापालिकेने मोठा गाजावाजा करीत शहरात पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली. मात्र, वाहनचालकांकडून पैसे दिले जात नसल्याने तसेच, वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ही योजना पाच ते सात ठिकाणच्या रस्त्यांवर रडतखडत सुरू होती. अखेर, परवडत नसल्याने संबंधित ठेकेदाराने कामाच्या ठेक्यातून माघार घेतल्याचे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे. परिणामी, ही योजना बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे.

वाहनांची वाढती संख्या
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीची समस्या निर्माण होत आहे. तसेच, रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे कारण देत पालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर हे आग्रही होते. शहरातील 396 ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू करण्यासाठी पालिकेने रस्ते रंगरंगोटीसह शेकडो फलक लावले. त्यावर लाखोंचा खर्च केला. तसेच, वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्यात आले. त्यावर अतिरिक्त खर्च करण्यात आला.

सुरुवातीला शहरातील 80 ठिकारी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नगरच्या निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. मात्र, वाहनचालक वाहन लावल्यानंतर पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, नागरिक उद्धटपणे बोलत शिवीगाळ करत असल्याचे प्रकारही घडले आहेत. दुसरीकडे, वाहतूक पोलिस बेशिस्त वाहनांवर कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. काही मोजके रस्ते सोडले तर, वाहतूक पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे बेशिस्तपणे वाहन लावण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, वाहनचालक शुल्क देत नाहीत. परिणामी, ही योजना मोजक्याच रस्त्यांवर रडतखडत सुरू होती.

‘काम परवडत नाही’
गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचार्‍यांसाठी होणारा खर्च पाहता हे काम परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे पत्र ठेकेदाराने नुकतेच पालिकेस दिले आहे. काही ठिकाणी यापूर्वीच पे अ‍ॅण्ड पार्क योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना लवकरच पूर्णपणे बंद होणार हे स्पष्ट होत आहे.

आयुक्तांसमोर प्रस्ताव ठेवणार
ठेकेदाराने काम बंद करण्याबाबत पत्र नुकतेच दिले आहे. यासंदर्भात आयुक्तांसमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निर्णयानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button