पुणे : आमच्या मेळाव्याला दहा लाख लोक येणार: मंत्री तानाजी सावंत यांना विश्वास | पुढारी

पुणे : आमच्या मेळाव्याला दहा लाख लोक येणार: मंत्री तानाजी सावंत यांना विश्वास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दसरा मेळावा हा व्यक्तीचा नव्हे, तर विचारांचा मेळावा असतो. आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आहे. विचारांचे सोने लुटण्यासाठी आमच्या दसरा मेळाव्याला दहा लाखांहून अधिक लोक उत्स्फूर्तपणे येतील, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. याबाबत विचारणा केली असता, लोक आमच्या दसरा मेळाव्याला स्वखुशीने येतील, आम्ही गाड्या भरून कोणालाही नेणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

विचारांचा निरंतन प्रवास ज्याला आवडतो, तो एकेक जण येऊन आमच्यात दाखल होत आहे. आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबतची निर्णयप्रक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंर्त्यांमध्ये सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांनी शेतकर्‍याला मारहाण करण्याबाबत विचारले असता, आपल्याला याबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Back to top button