राहू : पाटेठाण परिसरात अवैध धंदे वाढले | पुढारी

राहू : पाटेठाण परिसरात अवैध धंदे वाढले

राहू; पुढारी वृत्तसेवा: पाटेठाण (ता. दौंड) हद्दीतील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावले असून पोलिसांनी त्याचे समूळ उच्चाटन करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना परिसरातील भागामध्ये अवैध मटका, ताडी, जुगार, गावठी दारू आदींसारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत.

अर्थपूर्ण संबंधामुळे स्थानिक पोलिस यंत्रणाही कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक सरपंच ज्योती गोविंद यादव तसेच समता परिषदेच्या ज्योती झुरंगे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांनी मोर्चा काढत धंदे उद्ध्वस्त केले होते; मात्र पुन्हा जैसै थे परिस्थिती निर्माण झालेली आहे.

येथील ढाब्यामधून देशी- विदेशी बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. भीमा, मुळा-मुठा नदीकाठच्या भागामध्ये असलेल्या कुरणामध्ये पत्त्यांचे क्लब चालत असून पोलिस कारवाईस आले असता चिरीमिरी घेऊन कारवाई करत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अवैध मटकाचालकाच्या पाठीशी पोलिस उभे राहात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मटका व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरू असून यामुळे तरुणांचे संसार बुडाले आहेत.

Back to top button