पुणे : रेल्वेतून पाळीव प्राण्यांची वाहतूक सुसाट; वर्षभरात 782 पाळीव प्राण्यांची ने-आण

पुणे : रेल्वेतून पाळीव प्राण्यांची वाहतूक सुसाट; वर्षभरात 782 पाळीव प्राण्यांची ने-आण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अनेकांचे प्राणिप्रेम आपण नेहमीच पाहतो. त्यांचे प्राणिप्रेम इतके असते, की प्राण्यांनाही आपल्या मालकाचा लळा लागतो आणि मालक आणि त्याचा पाळीव प्राणी कायमच सोबत असतात. अशा पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीतून रेल्वेच्या पुणे विभागाला वर्षात 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर एकूण 782 पाळीव प्राण्यांची वाहतूक करण्यात आली आहे.

आपण नेहमीच रेल्वेतून मालाची, गाड्यांची पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक होत असल्याचे ऐकतो. मात्र, प्रवाशांना आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन जाण्याची देखील व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. एक स्वतंत्र डबा रेल्वेने पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केला आहे. याच व्यवस्थेतून रेल्वेच्या पुणे विभागाला 2022 या चालू वर्षात 7 लाख 34 हजार 340 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या वर्षभरात रेल्वेच्या या प्राणी विशेष डब्यातून 782 पाळीव प्राण्यांची वाहतूक करण्यात आली आहे.

दोन जणांकडून 5 हजारांचा दंड वसूल
एका बकरीची आणि एका कुत्र्याची रेल्वेच्या डब्यातून विनाबुकिंग वाहतूक केल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून दोन प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात श्वानमालकांकडून 2 हजार 975 रुपये, तर बकरीमालकाकडून 2 हजार 185 रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला आहे. याकरिता रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

प्राण्यांची वाहतूक करताना परवानगी हवी
फर्स्ट क्लास एसी तिकीट असल्यास एक कुत्रा सोबत घेऊन जाता येऊ शकतो. फक्त त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. त्याव्यतिरिक्त अन्य श्रेणीतील व्यक्तींना कुत्रा (कोणताही प्राणी) सोबत घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. त्याची प्रवाशांना रेल्वेच्या गार्ड डब्यात (ब्रेक यान) स्वतंत्र बुकिंग करावी लागेल. त्यासाठी 30 ते 60 किलोनुसार दर आकारणी केली जाते. कोणत्याही श्रेणीतील प्रवाशाला या डब्यात बुकिंग करता येऊ शकते. प्राण्यांना घेऊन जाण्यासाठी येथे प्रवाशांना एक फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यात प्राण्यांची खरी किंमत द्यावी लागेल. त्यात चुकीची माहिती दिली अन् कोणतीही दुर्दैवी घटना घडली, तर प्रवाशांना त्याचा मोबदला मिळू शकत नाही.

रेल्वेच्या वतीने प्रवाशांना पाळीव प्राणी घेऊन जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त त्या पाळीव प्राण्यांचे प्रवाशांनी स्वतंत्र बुकिंग करणे बंधनकारक आहे.

                                        – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

रेल्वेच्या पार्सल विभागात करता येते प्राण्यांची बुकिंग
ब्रेक यानमध्ये जाळी असलेल्या लोखंडी बॉक्समधून होते प्राणी वाहतूक
तिकीट दर – 120 रुपयांपासून पुढे (वजन कमीत कमी 30 किलो एका प्राणीनुसार.)
प्रवासाच्या अंतरानुसार तिकीट दर वाढणार
प्राण्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था मालकाला करावी लागते
विनातिकीट बुक करता वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई होणार
प्राण्यांच्या गळ्यात पट्टा, दोरी आवश्यक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news