पुणे : साडेतीन कोटी स्त्रियांची करणार आरोग्य तपासणी: आरोग्यमंत्री तानाजी सावंत | पुढारी

पुणे : साडेतीन कोटी स्त्रियांची करणार आरोग्य तपासणी: आरोग्यमंत्री तानाजी सावंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिलांची तपासणी करून त्यांचे कार्ड तयार करणे आणि औषधोपचार करणे हा उद्देश आहे. या अभियानांतर्गत साडेतीन कोटी महिलांची तपासणी करणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. गर्भवती महिलांना तीन महिन्यांनंतर प्रसूतीपर्यंत प्रतिदिन 300 रुपये भत्ता देण्याबाबतही विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरात राबवल्या जाणार्‍या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाचा शुभारंभ श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) महाविद्यालयातील सभागृहात डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मंचावर आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आरोग्य संचालक साधना तायडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. विजय कंदेवाड, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात ‘आभा’ या डिजिटल हेल्थ कार्डाचे वाटप करण्यात आले.

‘पोलिसांसारखी चौकशी करू नका’
रुग्णाला तातडीने उपचार देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे कागदपत्रांसाठी अडवणूक न करता आधी उपचार द्यावेत. रुग्ण रुग्णालयात आल्यावर त्याच्याकडे कागदपत्रांसाठी पोलिसांसारखी चौकशी करू नका, अशा सूचना तानाजी सावंत यांनी डॉक्टर, कर्मचारी यांना दिल्या.

Back to top button